लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वनाज ते आनंदनगर या अवघ्या १ किलोमीटर मेट्रो मार्गाची चाचणी काय झाली, सगळ्या मेट्रोचेच श्रेय घेण्याची राजकीय धडपड सुरू झाली आहे. या कार्यक्रमात कॉंग्रेसचे कोणी उपस्थित नव्हते.
मेट्रोचा पहिला ठराव काँग्रेसच्या सत्ताकाळात झाल्याची आठवण प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी करून दिली. काँग्रेसची स्वप्नपूर्ती झाली. काँग्रेस नेत्यांनी मेट्रोचा पाठपुरावा केला. भूसंपादन, राज्य, केंद्र सरकारची मंजुरी, वित्तीय संस्थांची मदत या प्रक्रिया काँग्रेसनेच मंजूर करून घेतल्या असल्याचे जोशी यांनी म्हटले आहे. सन २०१४ नंतरच्या भाजप सरकारने दोन वर्षे पुणे मेट्रोकडे दुर्लक्ष केले, अन्यथा हा प्रकल्प यापूर्वीच पूर्ण झाला असता, अशी टीका जोशी यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बळावर पुणे मेट्रो रूळावर आल्याचे म्हटले आहे. फुकटचे श्रेय लुबाडण्याची सवय असलेल्या भाजपच्या वाचाळवीरांनी कितीही वल्गना केल्या, तरी मेट्रोच्या इतिहासाची आठवण पुणेकर त्यांना करून देतील अशी टीका त्यांनी केली. राज्यात सत्ताबदल झाला व महाविकास आघाडीने मेट्रो प्रकल्पाला गती दिली. आता पुणेकर मेट्रोतून प्रवास करत असतील त्यावेळी महापालिकेतही सत्ताबदल झालेला असेल असा दावा जगताप यांनीही केला आहे.
चौकट
नेत्यांचा सूज्ञपणा
कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी श्रेयासाठीचा वाचाळपणा केला असला तरी ज्येष्ठ नेत्यांनी मात्र सुज्ञपणा दाखवत राजकीय शेरेबाजी टाळली. मेट्रोच्या चाचणी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील या नेत्यांनी अन्य पक्षप्रमुखांची नावे घेत त्यांनाही मेट्रो प्रकल्पाचे श्रेय दिले.