पुणे : नोटा बंदीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विरोधकांनी मानवी साखळी, मोर्चा, व्यंगचित्र प्रदर्शनाद्वारे या निर्णयाचा निषेध केला तर, भाजपाने नोटाबंदी समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबविली़ या आंदोलनांमुळे शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे़.
काँग्रेसचे जनआक्रोश आंदोलनपुणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज नोटबंदीमुळे मृत्यमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी स़ प़ महाविद्यालय ते वसंतदादा पाटील दरम्यान जनआक्रोश मोर्चा आयोजित केला होता़ शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली ५०० व १ हजार रुपयांच्या नोटांचे वर्षश्राद्ध घालण्यात आले़ यावेळी नोटाबंदी विषयी आयोजित केलेल्या व्यंगचित्राचे प्रदर्शन नागरिकांच्या चर्चेचा विषय बनला होता़ स़ प महाविद्यालय येथे मोर्चाच्या सुरुवातीला स्वप्न पुणे या संस्थेमार्फत पथनाट्य सादर करण्यात आले़ मानसी कुलकर्णी दिग्दर्शित या पथनाट्यामध्ये मोदी सरकारच्या कामगिरीचा निषेध व्यक्त करण्यात आला़ काँग्रेसच्या विविध नेत्यांनी मोदी सरकारच्या चुकीच्या कारभाराची पोलखोल केली़ माजी आमदार उल्हास पवार म्हणाले, मोदींच्या निर्णयाची माहिती खुद्द अर्थमंत्री अरुण जेटली यांना नव्हती़ मात्र, नाईलाजाने त्यांना हो हो करावे लागत आहे़ रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन व नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढीया हे मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणाला कंटाळून विदेशात निघून गेलेत़ या सरकारने नोटाबंदी व जीएसटीची कोणतीही पूर्वतयारी न करता जनतेला त्रास दिला़ त्यांना जनता सत्तेबाहेर काढल्याशिवाय राहणार नाही़.यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, गटनेते अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, प्रवक्ते रत्नाकर महाजन, अॅड़ अभय छाजेड, कमल व्यवहारे आदींची भाषणे झाली़ यावेळी नगरसेवक, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते़.
स्वाक्षरी मोहीमनोटा बंदीच्या समर्थनार्थ भाजपातर्फे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.