पुण्याचे काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी चौकीदाराच्या हस्ते केले जाहीरनाम्याचे प्रकाशन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 03:58 PM2019-04-16T15:58:58+5:302019-04-16T16:02:55+5:30
सुरक्षित पुणे, हरित पुणे, गतिमान पुणे, आनंदी पुणे यावर जाहीरनाम्यात भर देण्यात आला आहे.
पुणे : काँग्रेसचे पुण्याचे उमेदवार मोहन जोशी यांनी आज सर्वसामान्यांच्या हस्ते जाहिरनाम्याचे प्रकाशन केले. विशेष म्हणजे यात एक चौकीदार सुद्धा होता. मोदी में भी चौकीदार म्हणत प्रचार करत असताना काँग्रेसने थेट खऱ्या चौकीदाराला पाचारण केले. या चौकीदाराने मोदी स्वत:ला चौकीदार म्हणवून घेतात याबद्दल नाराजी व्यक्त केली. मोदी हे सर्वसामान्यांचे नाही तर अदानी, अंबानी यांचे चौकीदार असल्याचे तो यावेळी म्हणाला.
काँग्रेसने पुण्याचा जाहीरनामा समता भूमी फुले वाडा येथे प्रकाशित केला. सुरक्षित पुणे, हरित पुणे, गतिमान पुणे, आनंदी पुणे यावर जाहीरनाम्यात भर देण्यात आला आहे. जनतेला अपेक्षित असलेला विकास, त्यांची शहरासाठीची स्वप्ने, पुणे शहराच्या शाश्वत विकासाचे मॉडेल या मुद्यांचा जाहीरनाम्यात प्रामुख्याने समाविष्ठ आहे. हा जनतेच्या मनातील जनतेची स्वप्न पूर्ण करणारा, शहराचा सर्वांगीण विकास करणारा जाहीरनामा असल्याचे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले.
यावेळी बोलताना मोहन जोशी म्हणाले, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात महिला, विद्यार्थी आशा सर्व घटकांचा विचार केला आहे. हा फेकू नामा नाही तर विजयी झाल्यानंतर समता भूमी येथे येऊन दिलेली आश्वासने पूर्ण केली हे सांगणार असल्याचे ते म्हणाले. सर्वसामान्य पुणेकरांना न्याय देणारा, त्यांचे प्रश्न, समस्या सोडवणारा, शहराला शाश्वत विकासाच्या मार्गावर नेणारा असे जाहीरनाम्याचे स्वरूप असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
मोहन जोशी यांनी कष्टकऱ्यांच्या हस्ते जाहीरनामा प्रकाशित केला. यावेळी मोहंमद इस्माईल शेख हे खरेखुरे चौकीदार सुद्धा उपस्तिथ होता. शेख म्हणाले, मोदी हे सर्वसामान्यांचे नाही तर अंबानी, अदानी, मल्ल्या आणि निरव मोदी यांचे चौकीदार आहेत. खऱ्या चौकीदाराचं काम समजून घ्यायचं असेल तर बारा तास काम करून पहा, मग तुम्हांला समजेल असा टोलाही चौकीदार मोहंमद इस्माईल शेख यांनी लगावला.