लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) विकास आराखडा प्रसिद्ध झाला आहे. त्यावर सध्या हरकती मागविण्यात येत आहेत. पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाच्यावतीने नागरिकांच्या हरकती घेण्यात येणार आहे. त्यासाठी काँग्रेसने वकिलांची नेमणूक केली आहे. काँग्रेसच्या विधी विभागाच्यावतीने नागरिकांना मोफत सल्ला, मार्गदर्शन करून अडचणी सोडवण्यात येणार आहे. यासाठी कॉंग्रेस भवनाच्या पहिल्या मजल्यावर केंद्र सुरू करण्यात आले आहे.
पुणे जिल्हा काँग्रेस समितीने ‘पीएमआरडीए’संदर्भात नुकतीच काँग्रेस भवनात बैठक घेतली. या वेळी पुरंदर-हवेलीचे आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, पुणे जिल्हा विधी विभाग अध्यक्ष ॲड. राहुल ढाले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या वेळी भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खेड, हवेली, शिरूर, पुरंदर, दौंड येथील ब्लॉक अध्यक्ष उपस्थित होते.