पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यात काँग्रेसकडून त्यांचा काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येणार आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपाचा खुलासा न करता मोदी यांनी त्यावर मौन बाळगले आहे व नोटाबंदीच्या निर्णयाने गेले दीड महिना नागरिक त्रास सहन करीत आहे याबद्दल त्यांचा निषेध करणेच योग्य असल्याचे पक्षाने म्हटले आहे.नोटाबंदीच्या निर्णयाने आता सामान्य नागरिकांच्या हालाची परिसीमा झाली आहे. रांगेत उभे राहून अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. तरीही अजून मोदी आपल्या निर्णयाचे समर्थन करीत रोज नव्या अटी व नवे नियम, नवे कायदे जारी करीत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास होत आहे. केंद्र सरकारच आता हतबल झाल्याचे चित्र देशात निर्माण झाले असून, याला मोदीच जबाबदार असल्याची टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केली.त्याचबरोबर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या आरोपावर एका शब्दाचेही स्पष्टीकरण न देता मोदी राहुल यांची खिल्ली उडवीत आहेत. इतक्या गंभीर विषयाचा त्यांनी त्वरित खुलासा करणे गरजेचे असताना ते ही गोष्ट टाळत असून, त्याबद्दल त्यांच्या शनिवारच्या मेट्रो भूमिपूजनाच्या दौऱ्यात पक्षाच्या वतीने त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येईल, असे बागवे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
काँग्रेस करणार काळे झेंडे दाखवून निषेध
By admin | Published: December 24, 2016 12:56 AM