पुणे: स्मार्ट सिटीच्या १६० कोटी रूपयांच्या प्रकल्पात ५८ कोटी रूपयांचा खर्च करण्यावरून महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात बेबनाव झाला आहे. या विषयावरच्या मतदानात तटस्थ राहिलेल्या शिवसेनेला बाजूला ठेवत काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला आत्मपरीक्षणाचा जाहीर सल्ला दिला आहे.
काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, ‘‘महाविकास आघाडी म्हणून स्मार्ट सिटीच्या या सिग्नल प्रकल्पाला विरोध करायचा असे एकत्रितपणे ठरले होते. १६० कोटी रूपयांचा प्रकल्प त्यांचा, व त्यात महापालिकेने देखभाल दुरूस्तीसाठी म्हणून सलग ५ वर्ष ५८ कोटी रूपयांचा खर्च का करायचा असा विषय होता. प्रत्यक्षात हा विषय सर्वसाधारण सभेत मंजूरीस येताच राष्ट्रवादी काँग्रेसने त्याच्या बाजूने मतदान केले. काँग्रेसने मात्र ठरल्याप्रमाणे विरोध केला. शिवसेनेचे सदस्य तटस्थ राहिले.”
बागवे म्हणाले, “याआधीही अनेक विषयांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपासोबत मतदान करून वऱ्याच प्रकल्पांना व भ्रष्ट पद्धतीने काढण्यात आलेल्या निविदांना मान्यता देवून पुणे मनपाला आर्थिक अडचणीत आणण्याचे काम केले आहे. ही गोष्ट पुणेकर भविष्यात नक्कीच लक्षात ठेवतील. भाजपाचा महापालिकेतील मागील ५ वर्षांचा भ्रष्ट कारभार एकत्रपणे उघड करायचा व पुणे शहराचे हित लक्षात ठेवून काम करायचे असे ठरलेले असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला साथ देण्याचे अयोग्य काम केले आहे.”