Ravindra Dhangekar Meet Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीर बैठका, दौरे, भेटी-गाठी यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मित्र पक्षातील नेत्यांचा पाठिंबा मिळावा, यासाठी उमेदवार प्रयत्न करताना दिसत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला अद्यापही स्पष्ट झालेला पाहायला मिळत नाही. यातच काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी शरद पवारांची भेट घेतली.
भाजपाने पुणे लोकसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी घोषित करण्यात आली. तर मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे यांच्या पदरी निराशा पडली असली तर ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. वसंत मोरे अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक रिंगणात उतरू शकतात, असा कयास आहे. यातच रवींद्र धंगेकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना या भेटीबाबत माहिती दिली. तसेच भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यावर जोरदार टीका केली.
शरद पवार यांची भेट घेऊन सल्ला, मार्गदर्शन घेतले
पुण्यात शरद पवार यांच्या सहा सभा होणार असल्याची माहिती देताना रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. बापट साहेबांना मुरलीधर मोहोळ यांनी किती त्रास दिला, त्यांना किती छळले, हे सगळ्यांना माहिती आहे, असे सांगत, होळी आहे, वाईट प्रवृत्ती यांचा नाश होवो. शरद पवार यांची भेट घेऊन सल्ला, मार्गदर्शन घेतले. शेती ते आयटीपर्यंत शरद पवार यांचे काम आहे. निवडणुकीचे नियोजन, पक्षाच्या सभा या सगळ्यासंदर्भात चर्चा केली, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.
त्यांच्याकडे पैलवान असेल तर आमच्याकडे वस्ताद आहे मुरलीधर मोहोळ यांनी कुठल्या पैलवानला दूध पाजले? बिल्डर लोकांना दूध पाजले, हे क्षेत्र हे 'जय बजरंगबली'चे क्षेत्र आहे. पैलवान हा सर्वसामान्य कुटुंबातील असतो. पैलवान हा सगळ्यांचाच असतो. मुरलीधर मोहोळ यांनी गोखले, व्यास यांना दूध पाजले, त्यांनी आमच्या गरीब पैलवानांना अर्धा लीटर दूध पाजले नाही. जर त्यांच्याकडे पैलवान असतील तर आमच्याकडे वस्ताद आहेत, असा टोला रवींद्र धंगेकर यांनी लगावला.