'महाआघाडीसाठी कॉंग्रेस 'तैय्यार' पण प्रकाश आंबेडकरांकडूनच होतेय टाळाटाळ'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 08:06 AM2019-02-23T08:06:33+5:302019-02-23T08:18:34+5:30

कॉंग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी चव्हाण शुक्रवारी काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या पुण्यातील निवासस्थानी आले होते

Congress ready but Prakash Ambedkar avoided - Prithviraj Chavan | 'महाआघाडीसाठी कॉंग्रेस 'तैय्यार' पण प्रकाश आंबेडकरांकडूनच होतेय टाळाटाळ'

'महाआघाडीसाठी कॉंग्रेस 'तैय्यार' पण प्रकाश आंबेडकरांकडूनच होतेय टाळाटाळ'

Next

पुणे (प्रतिनिधी) : बहुजन वंचित विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर आघाडी करण्यासाठी कॉंग्रेस तयार आहे. पण ते आमच्या प्रस्तावावर टाळाटाळ करत असल्याचे दिसून येते. आंबेडकरांचा नक्की गेम प्लॅन काय आहे हेच अद्याप समजत नाही, असा आरोप काँंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

कॉंग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी चव्हाण शुक्रवारी काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या पुण्यातील निवासस्थानी आले होते. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. चव्हाण म्हणाले, लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँंग्रेस पक्ष देशभरात निरनिराळ्या पक्षांशी आघाडी करीत आहे. राज्यातसुद्धा छोट्या-मोठ्या पक्षांबरोबर आघाडी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्ष, शिवसेना युतीला मिळू नये, हा या मागचा प्रमुख उद्देश आहे. २०१४ ची लोकसभा निवडणूक आम्ही वेगवेगळी लढल्याने आमचे नुकसान झाले होते. यावेळी ते टाळण्याचा आमचा प्रयत्न असल्यानेच आंबेडकरांना सहभागी करुन घेण्यासाठी आमंत्रित करत आहोत. पण त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. आम्ही अजूनही आशा सोडलेली नाही. आम्ही चर्चेला तयार आहोत.

राज्यात शिवसेना आणि भाजपाची युती होणार याची आपल्याला खात्री होती. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे काही बिघडणार नाही. पण त्यामुळे सगळ्यात मोठे प्रश्नचिन्ह उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेबाबत निर्माण होते. चार वर्ष ज्यांच्या विरोधात सतत बडबड केली त्यांच्याशी संगत करण्याची वेळ ठाकरे यांच्यावर का आली हे कोडे आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.

पाकिस्तानचे काही होणार नाही
पाकिस्तानचा बाजार किंवा पाणी बंद करुन काहीही होणार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाकिस्तानचे पाणी बंद करु ही केलेली घोषणासुद्धा हास्यापद आहे. हा आंतरराष्ट्रीय मुद्दा असल्याने आपण अशा प्रकारे पाणी बंद करुच शकत नाही. अशा प्रश्नांवर तडकाफडकी निर्णय घेता येत नाहीत.
-पृथ्वीराज चव्हाण

राज्यात शिवसेना आणि भाजपाची युती होणार याची आपल्याला खात्री होती. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे काही बिघडणार नाही. पण त्यामुळे सगळ्यात मोठे प्रश्नचिन्ह उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेबाबत निर्माण होते. चार वर्ष ज्यांच्या विरोधात सतत बडबड केली त्यांच्याशी संगत करण्याची वेळ ठाकरे यांच्यावर का आली हे कोडे आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.

 

Web Title: Congress ready but Prakash Ambedkar avoided - Prithviraj Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.