पुणे : विधानसभा निवडणुकीत पुणे शहरातील आठही मतदारसंघापैकी वडगावशेरीचा अपवाद वगळता सर्व ठिकाणी महाविकास आघाडीला अपयश आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आलेल्या अतिआत्मविश्वास, पक्षा अंतर्गत व तीन पक्षामधील कलह आणि प्रचाराच्या सूक्ष्म नियोजनाचा असलेला अभावामुळे पराभवाचा सामना करावा लागला आहे.
यंदाची विधानसभा निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, उद्धवसेना यांची महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिंदेसेना यांची महायुती अशी झाली आहे. पुणे शहरातील आठ मतदारसंघापैकी सात ठिकाणी महायुतीचा विजय झाला आहे. केवळ वडगावशेरी मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला आहे. महायुतीमध्ये जागा वाटप होताना जास्त वादावादी झाली नाही. जागा वाटपावरून झालेली महायुतीमधील खळखळ ही जाहीरपणे बाहेर आली नाही. याउलट महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप आणि सत्ता येण्यापूर्वीच मुख्यमंत्रिपदावरून जाहीर वाद विवाद झाले. काँग्रेस आणि उध्दवसेनेमध्ये जागा वाटपावरून झालेले वाद मिटविण्यासाठी काही नेत्यांना या प्रक्रियेतून बाहेर ठेवावे लागले. लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते यांना अतिआत्मविश्वास आला होता.
या उलट महायुतीने या पराभवातून चांगलाच धडा घेतला. लोकसभेच्या वेळी झालेल्या सर्व चुका दुरुस्त केल्या. महाविकास आघाडीने संविधान बदलणार हा लोकसभेच्यावेळी केलेला प्रचाराचा मुद्दा विधानसभा निवडणुकीत महायुतीने खोडून काढला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वादग्रस्त विधाने, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर टीका करणे टाळले. महायुतीने विकासाच्या मुद्यावर भर दिला. विशेष करून लाडकी बहीण योजना, महिलांना एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलत, ज्येष्ठांना एसटीच्या प्रवास मोफत, शेतीपंपासाठी वीज बिल माफ या योजनाची जाहीर सभामधून प्रचार केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वंयसेवकांनी सूक्ष्म नियोजन करून जनजागृतीकरून प्रचार केला.
हडपसरला मतविभाजनाचा फटका
हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे चेतन तुपे आणि महाविकास आघाडीचे प्रशांत जगताप यांच्यामध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली. त्यात तुपे विजयी झाले. या मतदारसंघाच्या जागा वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि उध्दवसेना यांच्यामध्ये वादावादी झाली. ही वादावादी शेवटपर्यंत कायम राहिली. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांचे काम शिवसेनेच्या ठाकरे गटाने केले नाही. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांचे काम केले. त्यामुळे मत विभाजनाचा फटका प्रशांत जगताप यांना बसला. मनसेचे उमेदवार साईनाथ बाबर यांनाही ३२ हजार ७५१ मते मिळाली. त्याचा तोटाही जगताप यांना झाला.
अतिआत्मविश्वास नडला
खडकवासला मध्ये महायुतीचे भीमराव तापकीर विजयी झाले. महाविकास आघाडीचे सचिन दोडके यांना पराभवाचा सामना करावा लागला. दोडके यांच्या समर्थकांनी निकाल जाहीर होण्यापूर्वीच विजयाचे फलक लावले होते. त्यावरून दोडके यांच्या समर्थकांना अतिआत्मविश्वास होता. हा अतिआत्मविश्वास दोडके यांना नडला आहे. मनसेचे मयुरेश वांजळे यांना ४२ हजार ८९७ मते मिळाली त्यामुळे वांजळे यांनी सचिन दोडके यांची मते घेतली. या निवडणुकीच्या निकालामध्ये मनसेची मते निर्णायक ठरली. राष्ट्रवादीच्या फुटीचा तोटाही दोडके यांना झाला.
बंडखोरी, अंतर्गत कलहाचा बसला फटका
पर्वती मतदारसंघात महायुतीचे माधुरी मिसाळ आणि महाविकास आघाडीच्या अश्विनी कदम यांच्यामध्ये लढत झाली. माधुरी मिसाळ चौथ्यांदा आमदार झाल्या. या मतदारसंघात सुरुवातीला महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरीचे वारे होते. महायुतीला बंडखोरी रोखण्यात यश आले. मात्र, महाविकास आघाडीला काँग्रेसचे आबा बागुल यांची बंडखोरी रोखता आली नाही. ही बंडखोरी आणि महाविकास आघाडीमधील अंतर्गत कलहाचा फटका अश्विनी कदम यांना बसला.
मतदारांच्या ध्रुवीकरण तोटा, काँग्रेसचा अतंर्गत कलह
लोकसभा निवडणुकीत पुणे कॅन्टोन्मेेंट मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला १५ हजारांचे मताधिक्य होते. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसला विजयाची आशा होती. काँग्रेसने रमेश बागवे यांना उमेदवारी दिली; पण बागवे यांच्या उमेदवारीला काँग्रेसमधून विरोध होता. काँग्रेसमधील अंतर्गत कलहाचा बागवे यांना फटका बसला. याउलट भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने एकत्रितपणे काम केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिखावा न करता नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार केला. त्याचा महायुतीचे सुनील कांबळे यांना फायदा झाला. वंचित बहुजन आघाडीचे नीलेश आल्हाट यांनी आठ हजार मते मिळविल्याने काँग्रेसला फटका बसला. स्थानिक मुद्यांवरच्या प्रश्नांना बगल देऊन मतदारांचे ध्रुवीकरण करण्यात भाजपला यश आले.
नेत्यांच्या जाहीर सभाच झाल्या नाही
कोथरूडमध्ये महायुतीचे चंद्रकांत पाटील यांचा दणदणीत विजय झाला. महाविकास आघाडीने उद्धवसेनेचे चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी दिली होती. उद्धवसेनेमध्ये येथे उमेदवारी देण्यावरून वाद होते. पण मोकाटे यांच्या प्रचारासाठी उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या या मतदारसंघात जाहीर सभा झाल्या नाही. त्याचा फटकाही महाविकास आघाडीला बसला. त्यामुळे येथील निवडणूक एकतर्फी झाली.
काँग्रेसचा अंतर्गत कलह
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात महायुतीचे हेमंत रासने विजयी झाले. महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांचा पराभव झाला. काँग्रेसमध्ये धंगेकर यांना उमेदवारी देण्यावरून वाद होते. त्या वादातून कमल व्यवहारे यांनी बंडखोरी करून अपक्ष उभ्या राहिल्या. पण या बंडखोरीचा फारसा परिणाम झालेला नाही. पण काँग्रेसमधील अतंर्गत कलह आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीचा फटका धंगेकर यांना बसला.
बंडखोरी, प्रचारात मागे पडले
शिवाजीनगर मतदारसंघात महायुतीचे सिद्धार्थ शिरोळे विजयी झाले. महाविकास आघाडीचे दत्ता बहिरट यांचा पराभव झाला. काँग्रेसने दता बहिरट यांना उमेदवारी दिल्यामुळे मनीष आनंद यांनी बंडखोरी केली. मनीष आनंद यांना १३ हजार ०२८ मते पडली. प्रचाराच्या धामधुमीत दत्ता बहिरट आजारी पडले. त्यामुळे बहिरट यांच्या प्रचारावर मर्यादा आल्या. शिरोळे यांनी जोरदार प्रचार केला.
मतांचे धर्मयुध्द लढावे लागेल यांचा फायदा महायुतीला
विधानसभा निवडणुकीत बंटेगे तो कटेंगे, एक है तो सेफ है असा प्रचार भाजपकडून करण्यात आला आहे. त्याचबरोबर व्होट जिहादला प्रत्युत्तर देण्यासाठी मतांचे धर्मयुध्द लढावे लागेल, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील जाहीर सभांमधून केले होत. त्यामुळे मतांचे ध्रुवीकरण झाले. त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवारांना झाला आहे.