पुणे काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणी जाहीर; स्थानिक पातळीवर कही खुशी कही गम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 09:23 PM2021-08-27T21:23:47+5:302021-08-27T21:24:34+5:30
पदांचा स्विकार आणि जाहीर नकारसुद्धा
पुणे: काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणी दिल्लीहून जाहीर झाली आणि त्यातल्या पुण्यामधील नियुक्त्यांनी एकाच वेळी आनंद आणि निराशाही निर्माण झाली.
रमेश बागवे यांचे शहराध्यक्षपद कायम राहिले म्हणून त्यांनी आजच लगेच ब्लॉक बैठका घेण्यास सुरुवात केली तर त्या पदासाठी इच्छुक असलेल्या आजीमाजी नगरसेवकांनी खासगीत नाराजी जाहीर करण्यास सुरुवात केली. बैठकीकडे अर्थातच पाठ फिरवली.
प्रदेश प्रवक्ता पदावर असलेल्या गोपाळ तिवारी यांना प्रदेश सचिव करण्यात आले. त्यांनी पक्षाच्या व्हाटस अँप ग्रुपवर ही तर पदावनती आहे असे म्हणत पद स्विकारण्यासच नकार दिला. याच पदावर महिला शहराध्यक्ष सोनाली मारणे यांची नियुक्ती झाली. त्यांनी फेसबूकसह सगळ्या समाज माध्यमांवर थेट सोनिया गांधी राहूल गांधींपासून सर्व पदाधिकार्यांचे जाहीर आभार मानले.
प्रदेश उपाध्यक्ष असलेले मोहन जोशी यांना कोणतेही पद नाही तर अँड. अभय छाजेड यांना सरचिटणीस पदावर कायम ठेवण्यात आले. दोघेही माजी शहराध्यक्ष, बर्याच वर्षांचे अनुभवी यामुळे अळी मिळी गुप चिळी असे शांत आहेत. पण त्यांच्याविषयी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे की ही गोष्ट झाली तरी कशी?
उल्हास पवार हेही आता सांगेन गोष्टी युक्तीच्या चार सारखे आहेत, पण त्यांनाही स्थान मिळाले. त्यामुळे ते समाधानी तर का जागा अडवता ही त्यांच्या नियुक्तीवरची त्यांच्या इतक्याच ज्येष्ठ नेत्याने प्रतिक्रिया दिली.
माजी आमदार अनंत गाडगीळ प्रवक्तेपदी आरूढ झाले, पण ते पुण्याचे कसे काय असा प्रश्न त्यांच्या मुंबईतील रहिवासावरून नाही तर पुण्यातील सततच्या गैरहजेरीवरून विचारला जात आहे.
--//
मागची सलग पाच वर्षे काँग्रेसभवनची पायरीही न चढता प्रदेश कार्यकारिणीत आपटी न खाता जीत राहिलेल्या आणखी एका नियुक्तीचीही जोरदार चर्चा काँग्रेस भवनात आहे.