पुणे : भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये सातत्याने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. भाजपकडून काँग्रेसवर निशाणा साधताना ७० वर्षात काय केले असा सवाल देखील उपस्थित करण्यात येतो. मात्र, भाजपच्या टीकेला काँग्रेसकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार आहे. भारतीय जनता पार्टीकडून वारंवार होणाऱ्या टीकेला काँग्रेसकडून स्वातंत्र्य वारशाची गाथा सांगत प्रत्युत्तर दिले जाणार आहे. या राज्यव्यापी मोहिमेची सुरूवात १ ऑगस्टला टिळक वाड्यात होत आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी उपस्थित असतील. प्रदेश सरचिटणीस अँड. अभय छाजेड व विनायक देशमूख या मोहिमेचे राज्य समन्वयक आहेत. १ ते १५ ऑगस्ट स्वातंत्र्यपूर्व व त्यानंतर पुढे वर्षभर स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास जनतेसमोर मांडत ही मोहीम राज्यात राबवण्यात येणार आहे. 'व्यर्थ न हो बलिदान' असे मोहिमेचे नामकरण करण्यात आले आहे.
पटोले यांनी 'लोकमत' बरोबर बोलताना सांगितले की काँग्रेस, नेहरू गांधी परिवार यावर जी प्रसन्न टीका केली जात आहे. त्याला जनता उत्तर देईलच. आमचा उद्देश नव्या पिढीसमोर काँग्रेसचा स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग, स्वातंत्र्योत्तर काळात देश उभारणीत असलेले काँग्रेसचे, काँग्रेस नेत्यांचे योगदान याचा इतिहास मांडायचा आहे.
टिळक वाड्यात १ ऑगस्टला सुरुवात होईल. त्यादिवशी पुण्यातील काँग्रेसच्या जून्या घराण्यांच्या वारसांना बोलावण्यात येणार आहे. राज्यातील १५ हजारपेक्षा जास्त स्वातंत्र्य सैनिकांची नावे, पत्ते तालुकानिहाय वेगळे करण्यात आले आहेत. पक्षाचे तालुकाध्यक्ष तिथे जाऊन त्यांचा गौरव करतील.
स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात काँग्रेसचे फैजपूर अधिवेशन, आष्टी चिमूरचा लढा, नंदुरबारच्या शिरीषकुमारचे बलिदान, गवालिया टँक, अशा काही वैशिष्ट्यपूर्ण घटना व ठिकाणे आहेत. राज्यातील अशा ६ ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आपापल्या कार्यक्षेत्रात स्वातंत्र्य चळवळीशी संबधित छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करणार आहेत.
स्वातंत्र्य दिनापर्यंत चळवळीचा इतिहास व त्यानंतर पुढे वर्षभर स्वातंत्र्यानंतरची देश ऊभारणी अशा दोन स्तरात मोहिमेची रचना आहे. १५ ऑगस्टनंतर पुढे वर्षभर पक्षाच्या वतीने राज्याच्या सर्व जिल्हा व तालुक्यांमध्ये ही मोहिम राबवण्यात येणार आहे. व्याख्याने, प्रदर्शने, असे कार्यक्रम यात होतील.
नव्या पिढीसमोर काँग्रेसचा इतिहास येणं गरजेचं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आम्ही ही संधी घेत आहोत. स्वातंत्र्य चळवळीत कसलाही सहभाग नव्हता. त्यांनाही यानिमित्ताने याची माहिती मिळेल.नाना पटोले- प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.