मस्साजोग ते बीड या काँग्रेसच्या सदभावना यात्रेचे नियोजन पुण्याकडे

By राजू इनामदार | Updated: March 3, 2025 19:27 IST2025-03-03T19:25:29+5:302025-03-03T19:27:07+5:30

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच बीड जिल्ह्यातील काही प्रतिष्ठित नागरिकांनाही यात सामावून घेण्याचा प्रयत्न असणार

congress sadbhavana yatra from Massajog to Beed planning in Pune | मस्साजोग ते बीड या काँग्रेसच्या सदभावना यात्रेचे नियोजन पुण्याकडे

मस्साजोग ते बीड या काँग्रेसच्या सदभावना यात्रेचे नियोजन पुण्याकडे

पुणे: बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, जातीयवाद याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसच्या राज्य शाखेच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मस्साजोग ते बीड या सदभावना यात्रेचे नियोजन पुण्याकडे देण्यात आले आहे. माजी आमदार मोहन जोशी आपल्या काही कार्यकर्त्यांसह या सदभावना यात्रेचा मुक्काम तसेच अन्य संयोजन करणार आहेत. ८ व ९ मार्च अशी दोन दिवसांची ही यात्रा आहे.

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून बीड जिल्हा सध्या वाईट अर्थाने गाजतो आहे. त्याचबरोबर तिथे जातीयवादानेही पाय रोवले आहेत. काही राजकीय पक्षांचे हितसंबध यात गुंतले असल्याची टीका यावर होत आहे. लोकसभा निवडणुकीपासून या जिल्ह्यातील सामाजिक वातावरण गढुळ झाले असल्याचे बोलले जात आहे. तिथे घडणाऱ्या अनेक घटनांवरून यात तथ्य असल्याचेही दिसत आहे.

जोशी यांनी सांगितले की काँग्रेसने एक सामाजिक जबाबदारी म्हणून हा उपक्रम घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांना बीड व मस्साजोग येथील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच तिथे सामाजिक सलोखा निर्माण व्हावा यावर विश्वास असलेल्या नागरिकांचाही सहभाग यात्रेत अपेक्षित आहे. त्या दृष्टिने तिथे बैठका घेण्यात येतील. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच बीड जिल्ह्यातील काही प्रतिष्ठित नागरिकांनाही यात सामावून घेण्याचा प्रयत्न आहे.

मस्साजोग ते बीड हे अंतर सुमारे ५६ किलोमीटरचे आहे. मस्साजोग इथून निघाल्यानंतर त्यादिवशीचा रात्रीचा मुक्काम एका मठात होणार आहे. तिथेही काही सामाजिक, स्वयंसेवी संस्था, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या बैठका, त्यात नागरिकांची उपस्थिती असेल. त्याचे पूर्वनियोजन करण्यात येणार आहे असे जोशी यांनी लोकमत बरोबर बोलताना सांगितले.

Web Title: congress sadbhavana yatra from Massajog to Beed planning in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.