भोर : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या भोलावडे ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक वर्षांपासून असलेली काँग्रेसची सत्ता उलथून टाकण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले आहे. राष्ट्रवादीने ११ पैकी ८ जागा जिंकून ग्रामपंचायतीवर ताबा मिळाला आहे, पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे थेट सरपंच निवडणुकीतही भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तनचे प्रवीण बाळासाहेब जगदाळे यांनी १४१ मतांनी विजय मिळविला. दरम्यान, आमदार संग्राम थोपटे यांचे निकटवर्तीय माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे यांच्या वर्चस्वातील ग्रामपंचायत राष्ट्रवादीने मिळविल्याने थोपटे गटाला धक्का बसला आहे.
भोलावडे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत सरपंच पदासाठी लोकांमधून झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत भैरवनाथ परिवर्तन पॅनलचे प्रवीण बाळासाहेब जगदाळे यांना (१०६८ मते ) मिळवून १४१ मतांनी विजय मिळविला, तर भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे वैभव सत्यवान आवाळे यांना (९२७ मते ) मिळाली, तर १२ मते नोटाला गेली. यामुळे भोलावडे ग्रामपंचायतीत परिवर्तन होऊन ग्रामपंचायतीवर मागील अनेक वर्षांपासून एकहाती सत्ता असलेल्या काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
ही निवडणूक सत्ताधारी विठ्ठल आवाळे गटाच्या पॅनलला आत्मपरीक्षण करायला लावणारी, तर विरोधी परिवर्तन पॅनेलचा विश्वास वाढविणारी ठरली आहे. निकालानंतर परिवर्तन पॅनेलच्या विजयी उमेदवारांनी भोलावडे गावात जाऊन मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर गावातून मिरवणूक काढत आनंद व्यक्त केला.
दत्तात्रय जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार, कंसात मते-
प्रभाग क्रमांक १: मनोज एकनाथ मोरे (४०७ ), रेश्मा मंगेश आवाळे (३९३ ).
प्रभाग २: ज्ञानेश्वर पांडुरंग तारू (२६६), प्रशांत शशिकांत पडवळ (२५७), पुष्पा दिलीप आवाळे (२७७).
प्रभाग ३: अविनाश विष्णू आवाळे (३०१), भाग्यश्री रोशन सावंत (२६५).
प्रभाग ४ : गणेश जगन्नाथ आवाळे (१४६).
भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे ३ विजयी उमेदवार
प्रभाग १: रूपाली तुकाराम इभाडे (४००), वैशाली विश्वनाथ आवाळे (२१६).
प्रभाग ४ : शुभांगी अजय रणखांबे (१४६).
मासेमारी करणारा तरुण झाला ग्रामपंचायत सदस्य
भोलावडे ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक २ मधून भैरवनाथ परिवर्तन पॅनेलचे ज्ञानेश्वर पांडुरंग तारू यांनी (२६६ मते), तर भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे बाळासाहेब नामदेव कुंभार यांना (२१३ मते) मिळाली आणि उद्योजक असलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासो कुंभार यांचा ५३ मतांनी पराभव करून ज्ञानेश्वर तारू जायंटकिलर ठरला आहे.
भोलावडे गावातील नागरिकांनी ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन करून सत्ता आमच्या हातात सत्ता दिली आहे. ग्रामस्थांना विश्वासात घेऊन गावातील पिण्याच्या पाण्याचा कचऱ्याच्या प्रश्नासह गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहे.
प्रवीण जगदाळे, नवनिर्वाचित सरपंच.
किवतच्या पहिल्याच निवडणुकीत तानाजी चंदनशिव सरपंचपदी
भोलावडे ग्रामपंचायतीतून किवत विभक्त झाले आहे. त्यामुळे किवत ग्रामपंचायतीची ही पहिलीच निवडणूक होती. या ग्रामपंचायतीतील सरपंचपदाच्या थेट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तानाजी चंदनशिव यांनी २६० मते मिळवीत विरोधी रामचंद्र चंदनशिव यांच्यावर १७ मतांनी विजय मिळविला. रामचंद्र चंदनशिव यांना २४३ मते मिळाली, तर अजित चंदनशिव यांना १५५, तर मंगल चंदनशिव यांना २१ मते मिळाली.
विजयी उमेदवार
प्रभाग एक : अक्षय यशवंत चव्हाण (१३४ ), संगीता गोरक्ष बदक (१६१), पायल शरद बोडके (१५०).
प्रभाग दोन : प्रल्हाद रामचंद्र चंदनशिव (१०५).