काँग्रेसचा आता ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ चा नारा; देशव्यापी मोहीम राबवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 18:01 IST2025-01-15T18:01:23+5:302025-01-15T18:01:30+5:30
राज्यघटनेनुसार देशाचे कामकाज चालणे का महत्वाचे आहे हे या मोहिमेतून जनतेसमोर नेण्यात येणार

काँग्रेसचा आता ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ चा नारा; देशव्यापी मोहीम राबवणार
पुणे: देशातील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सातत्याने पराभवाचा सामना करणाऱ्या काँग्रेस आता ‘जय बापू, जय भीम जय संविधान’ असा नारा देत देशव्यापी जनसंपर्क मोहिम राबवणार आहे. येत्या २६ जानेवारीला पक्षाच्या वतीने ‘संविधान वाचवा’ या राष्ट्रीय पदयात्रा मोहिमेचा प्रारंभ होणार असून पुढे वर्षभर ती सुरू राहील. यात कार्यकर्त्यांच्या माध्यमातून देशातील प्रत्येक घराघरात संपर्क साधण्यात येणार आहे. राज्यघटनेनुसार देशाचे कामकाज चालणे का महत्वाचे आहे हे यातून जनतेसमोर नेण्यात येईल.
अखिल भारतीयकाँग्रेस समितीने हा कार्यक्रम तयार केला आहे. काँग्रेसच्या बेळगावात होणाऱ्या विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीतच याची घोषणा करण्यात येणार होती, मात्र त्यावेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे अचानक निधन झाल्यामुळे तो कार्यक्रम रद्द झाला. ‘जय बापू, जय भीम जय संविधान’ या कार्यक्रमासाठी काँग्रेसने मध्यप्रदेशातील महू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरची निवड केली आहे. या दिवशी देशाच्या प्रत्येक शहर, जिल्हा, तालुका तसेच गावस्तरावरील शाखांच्या वतीने पक्ष कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रमांचे आयोजन करून परिसरामध्ये पदयात्रा काढण्यात येईल.
याच दिवसापासून पुढे वर्षभर संविधान वाचवा राष्ट्रीय पदयात्रा मोहिम राबवण्यात येणार आहे. पक्षाचा जनतेतील पाया भक्कम करणे, त्यासाठी घरोघर जाऊन मतदारांबरोबर संपर्क साधणे, त्यांना पक्षाची धोरणे, स्वातंत्ऱ्य चळवळीतील योगदान याची माहिती देणे व प्रामुख्याने देशासाठी राज्यघटना किती व का महत्वाची आहे यासंबधीची जागृती करणे असा कार्यक्रम यात पक्ष कार्यकर्त्यांसाठी देण्यात आला आहे. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री यांनी ससंदेतील भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा केलेला अवमान हाही मुद्दा यात घेण्यात येणार आहे.
या मोहिमेत अन्य काही कार्यक्रमांचाही समावेश करण्यात येणार आहे. पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी सक्रिय रहावेत, त्यांच्यासमोर काही उद्दीष्ट असावे यासाठी म्हणून ही वर्षभराची मोहिम आखण्यात आली आहे. यातून कार्यकर्ता प्रशिक्षित होण्याबरोबरच जनतेमध्येही देशाची राज्यघटना, राज्यकारभार, वर्तमान तसेच भविष्यातील धोके याबाबत जागरूकता यावी या दृष्टिने यातील कार्यक्रमाची रचना करण्यात आली आहे. अन्य तपशील पक्षाच्या वतीने नंतर कळवण्यात येतील असेही जिल्हाध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांना यासंबधी पाठवण्यात आलेल्या पत्रात नमुद करण्यात आले आहे.