काॅंग्रेस हा विचार असून ताे कधीही मरणार नाही : बी. जे. खताळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 09:52 PM2018-03-21T21:52:49+5:302018-03-22T14:10:02+5:30
महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रीमंडळातले मंत्री असलेले विजय खताळ हे येत्या 26 मार्चला अापल्या वयाची शंभरी पार करत अाहेत. खताळ हे दीर्धकाळ महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय हाेते. त्यांनी बुधवारी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.
पुणे : काँग्रेस ही केवळ एक संघटना नसून तो एक विचार आहे. आणि तो महात्मा गांधीनी दिलेला विचार आहे. त्यामुळे काँग्रेस हा विचार कधीही मरणार नाही, असे मत महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रीमंडळातले मंत्री बी.जे.खताळ यांनी व्यक्त केले.
श्री आदीशक्ती फाऊंडेशनच्या वतीने शनिवार पेठेतील साधना मिडिया सेंटर येथे खताळ यांच्याशी संवादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी साधनाचे संपादक विनोद शिरसाठ, श्री आदिशक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष दत्ता पवार, खताळ यांचे पुतणे संतोष खताळ आदी उपस्थित होते.
चले जावचे आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, पहिल्या मंत्रीमंडळाची स्थापना, विविध मुख्यमंत्र्यांबरोबरचे अनुभव, निर्णय घेताना पाळलेली तत्त्वनिष्ठा, गांधी घराण्याची परंपरा, राजकारणाची सद्यस्थिती, सक्रिय राजकारणापासून दूर जात जगत असलेले आनंदी आणि समाधानी जीवन, आरोग्यसंपन्न शरीरयष्टी अशा वेगवेगळ्या विषयांवर खताळ यांनी आपल्या कडक शिस्तीच्या शैलीत परखड उत्त्तरे दिली.
खताळ म्हणाले, राजकारणात येण्याआधी राजकारण कश्यासाठी करायचे हे ठरवायला हवे. त्याग हा राजकारणाचा पाया आहे. वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण हे माझे आवडते मुख्यमंत्री होते. सरकार कसे चालवायला हवे याचे योग्य ज्ञान असलेली ही दोन व्यक्तिमत्वे होती. काँग्रसमधील घराणेशाही बाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, लोकांनी इंदिरा गांधी व राजीव गांधी यांना लोकांनी स्विकारलं होतं. अलीकडे राहुल गांधीनाही लोकांनी स्विकारले आहे, त्यामुळे याला घराणेशाही म्हणता येणार नाही.
ए. आर. अंतुले यांचे सरकार पडल्याची आठवण सांगताना खताळ म्हणले, सत्ता मिळाल्यावर काहीही करता येते, असे अंतुलेंना वाटत होते. त्यामुळे अंतुलेंच्या सरकारला त्याकाळी पायऊतार व्हावे लागले होते. राजकारणाचा अर्थ योग्यरित्या समजून घेतला, तर जनतेच्या कल्याणासाठी फायदेशीर ठरेल. सरकार जनतेचे असते. सत्ता आपल्या हातात आहे, म्हणजे आपण हवे ते करु शकू, ही भावना आपल्या मनात असता कामा नये. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन राजकारण करायला हवे.