मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात काँग्रेस काढणार सद्भावना यात्रा

By राजू इनामदार | Updated: April 12, 2025 08:59 IST2025-04-12T08:59:14+5:302025-04-12T08:59:29+5:30

प्रदेशाध्यक्षांचा पुढाकार : वाढत्या विद्वेषाला प्रेमभावना हेच उत्तर

Congress to take out Sadbhavana Yatra in Chief Minister's Nagpur | मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात काँग्रेस काढणार सद्भावना यात्रा

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात काँग्रेस काढणार सद्भावना यात्रा

पुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहराच्या दंगलग्रस्त भागात काँग्रेस सद्भावना यात्रा काढणार आहे. समाजात जातीय धार्मिक विद्वेष वाढत असून त्याला उत्तर म्हणूनच ही सद्भावना यात्रा असणार आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. १६ एप्रिलला निघणाऱ्या या यात्रेत पक्षाचे सर्व राज्यस्तरीय तसेच स्थानिक नेते, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सपकाळ शुक्रवारी दुसऱ्या वेळी पुणे दौऱ्यावर आले होते. महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांनी सकाळी समताभूमीला भेट दिली व महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. दुपारी पुण्यातील एका खासगी भेटीत ‘लोकमत’बरोबर बोलताना सपकाळ यांनी सद्भावना यात्रेची माहिती दिली. याआधी त्यांनी बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मस्साजोग ते बीड अशी दोन दिवसांची सद्भावना यात्रा काढली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. अनेक गावांमधून लोक स्वयंस्फूर्तीने या यात्रेत सहभागी झाले होते.

त्यावरून बोलताना सपकाळ यांनी सांगितले की, समाजातील जातीय तसेच धार्मिक विद्वेष वाढतच चालला आहे. त्याला खतपाणी मिळण्यासारखी स्थिती आहे. काँग्रेस पक्षाने नेहमीच सर्वांना बरोबर घेत चालण्याची भूमिका घेतली आहे. समाज एकसंध असावा, तिथे जातीय तसेच धार्मिक द्वेषाला, तिरस्काराला काहीही महत्त्व असू नये हेच काँग्रेसचे उद्दिष्ट आहे. त्यामुळेच समाजातील या वाढत्या विद्वेषाला प्रेमभावनेचे उत्तर देण्याची जबाबदारी काँग्रेसचीच आहे. ती लक्षात घेऊनच नागपुरात दंगलग्रस्त भागात या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

काँग्रेसचे सगळे नेते, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यात्रेत सहभागी होतील. नागपूर शहर कधीही दंगलींसाठी प्रसिद्ध नव्हते. किंबहुना राज्यातील काही ठिकाणी अशांतता, अस्वस्थता असली तरीही नागपुरातील शांततेचा कधी भंग झाला नाही. अशा शहरामध्ये दंगल व्हावी, त्याचे निमित्त कोणाची तरी कबर ठरावे हे सगळे चिंता करण्यासारखे आहे, असे सपकाळ म्हणाले. कोणीतरी यात पुढाकार घ्यायलाच हवा, त्यासाठी काँग्रेसच योग्य आहे असे वाटले म्हणूनच या सद्भावना यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, असे सपकाळ यांनी सांगितले.

हा पक्षाचा उपक्रम आहे, मात्र त्यात फक्त राजकारणच आहे असे नाही. त्यामुळे कोणीही स्थानिक संस्था, संघटना यात सहभागी होऊ शकतात. दंगलग्रस्तांना दिलासा देणे, तुम्ही एकटे नाहीत, आम्ही तुमच्याबरोबर आहोत हे त्यांना सांगणे हा मुख्य उद्देश आहे. कोणाला राजकीय प्रत्युत्तर वगैरे देण्यासाठी ही यात्रा आहे असे समजणे योग्य नाही.
- हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस 

Web Title: Congress to take out Sadbhavana Yatra in Chief Minister's Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.