काँग्रेसने पुण्यासाठी वापरला ' हा ' अजब फंडा.. नंतरच ''मोहन जोशीं '' च्या हाती दिला झेंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 12:35 PM2019-04-03T12:35:11+5:302019-04-03T12:53:20+5:30
प्रदेश शाखेकडून आलेल्या तीन नावांशिवाय अन्य नावे अचानक समोर आल्यामुळे काँग्रेसच्या केंद्रीय निवड समितीच्या सदस्यांनाही निर्णय घेणे अवघड झाले होते.
पुणे : कोणाचेही एक नाव निश्चित होत नसल्यामुळे पक्षातील वरिष्ठांनी स्वत: एका एजन्सीच्या माध्यमातून थेट पुणे लोकसभा मतदारसंघात सर्वेक्षण केल्यानंतरच मोहन जोशी यांचे नाव उमेदवार म्हणून निश्चित करण्यात आले असल्याचे समजते. खुद्द जोशी हेही नाव मागे पडल्याचे समजून स्पर्धेतून बाहेर पडले होते, मात्र या सर्वेक्षणाच्या अहवालाने त्यांना संजीवनी मिळाली.
पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या एजन्सीने पक्षातील कार्यकर्ते, शहरातील झोपडपट्टी तसेच व्यापारी व व्यावसायिक अशा तीन स्तरात ही पाहणी केली. या थरातील काही व्यक्तींना काँग्रेसचा उमेदवार म्हणून कोणाला पसंती द्याल व का अशी विचारणा करण्यात आली. पालिकेतील पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे, शेतकरी कामगार पक्षातून काँग्रेस पक्षात लोकसभेच्या उमेदवारीसाठी म्हणून प्रवेश करणारे संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड व माजी आमदार असलेले मोहन जोशी अशी तीन नावे होती.
प्रदेश शाखेकडून आलेल्या तीन नावांशिवाय अन्य नावे अचानक समोर आल्यामुळे काँग्रेसच्या केंद्रीय निवड समितीच्या सदस्यांनाही निर्णय घेणे अवघड झाले होते. त्यातच प्रविण गायकवाड यांच्या नावाला प्रदेश शाखेकडून संमती होती तर स्थानिक शाखेचा मात्र तीव्र विरोध होता. पक्षाबरोबर एकनिष्ठ असलेल्या कोणालाही उमेदवारी द्या, मात्र पक्षाबाहेरच्या कोणालाही नको, त्याचा पक्षाच्या प्रतिमेवर अनिष्ट परिणाम होईल असे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे केंद्रीय निवड समितीला निर्णय घेणे अशक्य झाले व त्यांनी हा विषय पक्षातील वरिष्ठांकडे नेला. उमेदवार जाहीर करण्यासाठी विलंब होण्यामागे हेच कारण होते.
पक्षातील या वरिष्ठ नेत्याने त्यानंतर थेट पक्षाध्यक्षांकडे चर्चा करून तीन दिवसात सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे या एजन्सीच्या काही कर्मचाऱ्यांनी पुण्यात येऊन वरिल तीन स्तरांमधील काही निवडक समुदायांबरोबर चर्चा केली. त्यात सर्वाधिक पुढे जोशी यांचे नाव असल्याचे समजले. पक्षातील सुत्रांना याविषयी माहिती विचारली असता पक्षाबरोबर कायम एकनिष्ठ या मुद्द्यावर नागरिकांनी जोशी काँग्रेसचे उमेदवार असावेत असे म्हटले असल्याचे सांगण्यात आले. एजन्सीने हा अहवाल पक्षातील वरिष्ठांना सादर केल्यानंतरच पुण्यातील काँग्रेसचा उमेदवार म्हणून मोहन जोशी यांचे नाव त्वरेने जाहीर करण्यात आले.