सोनिया गांधी कणखर स्वभावाच्या नेत्या, सर्वोच्च पद नाकारणे ही मोठी गोष्ट- पृथ्वीराज चव्हाण

By राजू इनामदार | Published: December 2, 2024 11:23 PM2024-12-02T23:23:09+5:302024-12-02T23:23:49+5:30

नुकतीच पार पडलेली निवडणूक आणि इव्हीएम याबद्दलही मांडले रोखठोक मत

Congress veteran leader Prithviraj Chavan praises Sonia Gandhi for sacrifice she made over Prime Minister post in UPA govt | सोनिया गांधी कणखर स्वभावाच्या नेत्या, सर्वोच्च पद नाकारणे ही मोठी गोष्ट- पृथ्वीराज चव्हाण

सोनिया गांधी कणखर स्वभावाच्या नेत्या, सर्वोच्च पद नाकारणे ही मोठी गोष्ट- पृथ्वीराज चव्हाण

राजू इनामदार, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : सोनिया गांधी या कणखर व ठाम स्वभावाच्या नेत्या आहेत. देशाचे चालून आलेले सर्वोच्च पद नाकारणे ही फार मोठी गोष्ट असते. त्यामुळेच त्या घटनेचे स्मरण म्हणून गेली २० वर्षे पुण्यात साजरा करण्यात येत असलेला सेवा, त्याग, कर्तव्य सप्ताह हा देशातील एकमेव कार्यक्रम आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहाय्यातून साजऱ्या करण्यात येणाऱ्या या सप्ताहाचे उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या पद्मजी सभागृहात झाले. माजी आमदार उल्हास पवार प्रमुख पाहुणे होते. चव्हाण यांनी यावेळी सोनिया गांधी यांच्या युपीए सरकारमधील अनेक आठवणींना उजाळा दिला, त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीत झालेला काँग्रेसचा पराभव व इव्हीएम बद्दल केले जाणारे आरोप याचाही समाचार घेतला.

"माहितीचा अधिकार, रोजगाराचा हक्क असे अनेक कायदे युपीए सरकारच्या कारकिर्दीत झाले, त्यामागे सोनिया गांधी याचा आग्रह होता. काँग्रेसमधीलच अनेक वरिष्ठ नेत्यांचा माहितीच्या अधिकार कायद्याला विरोध होता, मात्र हे झालेच पाहिजे असे सोनिया गांधी यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाला त्यांच्याच कष्टाने संजीवनी दिली, त्यामुळे काँग्रेसपक्ष सत्तेवर आला होता. अशा वेळी कोणीही ते पद त्वरीत घेतले असते. मात्र सोनिया गांधी यांना शब्दश: एका सेकंदात ते पद नाकारले," असे ते म्हणाले.

"इव्हीएम यंत्रांबद्दल अनेक आरोप होत आहेत. लोकशाहीमध्ये लोकांनी विचारलेल्या शंकाना, आक्षेपांना उत्तर देणे, त्याचे निराकरण करणे हे सरकारचे, निवडणूक आयोगाचे कामच आहे. ते सोडून निवडणूक आयुक्त व सरकार इव्हीएम बद्दल आरोप केल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहे. लोकांचा लोकशाही यंत्रणेवर असलेला विश्वास उडाला तर सगळेच अवघड होईल. आंतरराष्ट्रीय तज्ञांची समिती स्थापन करून त्यांच्याकडून चौकशी करा किंवा मग मतदान झाल्यानंतर व्हीव्हीपॅटमध्ये जमा होणाऱ्या सर्व चिठ्ठ्यांची मोजणी करा," अशी मागणी चव्हाण यांनी केली.

उल्हास पवार यांनी अडचणींमधून काँग्रेसपक्ष पुन्हा उभारी घेऊ शकतो, मात्र त्यासाठी नेत्यांनी प्रशिक्षित कार्यकर्ते तयार करावेत, असे सांगितले.

Web Title: Congress veteran leader Prithviraj Chavan praises Sonia Gandhi for sacrifice she made over Prime Minister post in UPA govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.