Deenanath Mangeshkar Hospital: पुण्यात तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने उपचारांसाठी १० लाख रुपयांची अनामत रक्कम जमा करण्यास सांगितल्याचा आरोप भिसे कुटुंबियांनी केला होता. रक्कम जमा न केल्याने तनिषा भिसे यांच्यावरील उपचारांना उशीर झाला आणि त्या दगावल्या. यानंतर राजकीय पक्षांसह विविध नागरिक संघटनांनी रुग्णालयाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर रुग्णालयाबाबत अनेक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. दीनानाथ रुग्णालयाने गरीब रुग्णांचा ३० कोटींचा निधी वापरलाच नसल्याचे चौकशी अहवालातून समोर आलं आहे. यावरुनच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट मंगेशकर कुटुंबियांवर निशाणा साधला. या कुटुंबाकडे माणुसकी नसल्याचे वडेट्टीवारांनी म्हटलं.
तनिषा भिसे यांचा उपचारांअभावी मृत्यू झाल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात संतापाची लाट उसळली. उपचारांसाठी आलेल्या भिसे कुटुंबियांकडे डॉ. घैसास यांनी १० लाखांची रक्कम मागितल्याची कबुली दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉक्टर धनंजय केळकर यांनी दिली होती. त्यानंतर या धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांसाठीचा ३० कोटींपेक्षा अधिक निधी वापरलाच नसल्याचे समोर आले आहे. यावरुनच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबायांवर टीका केली. मंगेशकर कुटुंब लुटारुंची टोळी असल्याचे विधान विजय वडेट्टीवार यांनी केले. त्यामुळे आता नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
गरिबांना लुटायचे हे असले धंदे बंद झाले पाहिजेत - विजय वडेट्टीवार
"कसले ते मंगेशकर कुटुंब. ही लुटारुंची टोळी आहे. यांच्यापैकी कुणी कधी दान केल्याचे पाहिले आहे का? गाणं चांगले गायलं म्हणून सगळ्यांनी त्यांना मिरवलं. लता दीदी, आशा दीदी, हे दीदी, ते दीदी. त्यांचे एवढेच जर लोकांसाठी आणि देशासाठी समर्पण असतं तर त्यांनी सेवा केली असती. यांची स्टोरी मी रोज वाचतो आहे. ज्या खिलारे पाटलांनी त्यांना जमीन दिली त्यांनाही सोडलं नाही. यांच्यात कसली माणुसकी आहे? हे माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असे मी मानतो. अशा प्रकारे मॅनेटमेंट चालवून गरिबांची लूट करून शोषण करणारे असतील तर हे कलंक आहे. यामध्ये यांना कुणीही साथ देऊ नये. यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. चॅरिटी म्हणून योजनेचा फायदा घ्यायचा आणि गरिबांना लुटायचे हे असले धंदे बंद झाले पाहिजेत," असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
हे रुग्णालय मंगेशकर कुटुंबीयांनी मोठ्या मेहनतीने उभारलं - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
"दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे स्वर्गीय लता मंगेशकर कुटुंबीयांनी मोठ्या मेहनतीने उभारलेल आहे. रुग्णालयात अनेक शस्त्रक्रिया आणि उपचार होतात. त्यामुळे सगळं काही रुग्णालयाचे चुकीच आहे. जे चुकीचं आहे, तिथं चुकीचं म्हणाव लागेल. परंतु, ती चुक सुधरावी लागेल, ती चुक रुग्णालयाने सुधारल्यास मला आनंदच आहे," अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.
दरम्यान, टीकेची झोड उठल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने इमर्जन्सी मधील कुठल्याही रुग्णाकडून अनामत रक्कम घेणार नसल्याचे जाहीर केले आहे.