काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांच्या गाडीला अपघात; थोडक्यात बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 12:01 PM2019-11-07T12:01:59+5:302019-11-07T12:17:10+5:30
पलूसचे आमदार आणि काँग्रेस नेते विश्वजित कदम यांच्या चारचाकीला बुधवारी रात्री मोठा अपघात झाला
पुणे - पलूसचे आमदार आणि काँग्रेस नेते विश्वजित कदम यांच्या चारचाकीला बुधवारी रात्री मोठा अपघात झाला. मात्र सुदैवाने कदम यांच्यासह चालक आणि त्यांच्या सचिवांना कोणतीही दुखापत झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 12.30 च्या दरम्यान आमदार कदम यांची मर्सिडीज कार मुंबईहून पुण्याला येत होती. त्यावेळी राजगड बंगला या त्यांच्या बीएमसीसी महाविद्यालयासमोरील घरासमोर दुचाकीस्वाराला वाचवताना गाडीची झाडाला धडक बसली. धडक मोठी असली तरी एअर बॅगमुळे कदम बचावले असून फक्त त्यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. या अपघातात गाडीचे मात्र मोठे नुकसान झाल्याचे समजते.
'मुंबईहून पुण्याला येत असताना माझ्या गाडीला अपघात झाला हे वृत्त खरे आहे. काल रात्री पुण्यामध्ये गाडी झाडाला धडकल्याने अपघात झाला. मात्र सुदैवाने कोणतीही मोठी हानी झालेली नाही. मी व ड्रायव्हर दोघेही सुखरूप आहोत. माझ्या डाव्या खांद्याला किरकोळ मार लागला आहे. सर्व वैद्यकीय चाचण्या करून घेतल्या असून कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. साहेबांचे आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या सदिच्छा पाठीशी असल्याने मी सुखरूप आहे' अशी माहिती कदम यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली आहे. तसेच प्रकृतीबाबत कोणत्याही अफवांना जनतेने बळी पडू नये असे आवाहनही विश्वजित कदम यांनी केले आहे.