पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा राजकीय दौरा आहे, त्यांनी संसदेत महाराष्ट्राचा अवमान केला, त्यामुळे त्यांना आम्ही काळे झेंडेच दाखवणार व आंदोलन करणारच असे काँग्रेसच्या शहर शाखेच्या वतीने जाहीर करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचाही निषेध यावेळी करणार असल्याचे सांगण्यात आले. काँग्रेसभवनमध्ये प्रसारमाध्यम प्रतिनिधींबरोबर बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी आंदोलनाची माहिती दिली.
बागवे म्हणाले, महापालिकेतील सत्तेच्या मागील ५ वर्षात भारतीय जनता पार्टीला एकही प्रकल्प पुर्ण करता आला नाही. ते अपयश झाकण्यासाठी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोदी यांचा दौरा ठरवण्यात आला. मोदी यांनी लोकसभेत बोलताना महाराष्ट्राने देशात कोरोना पसरवला असे अवमानकारक वक्तव्य केले. राज्यपाल भगतिसंग कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करतात हे सगळे महाराष्ट्राला संताप आणणारेच आहे. त्यामुळेच काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येणार आहे.
पोलिसांकडे याची रितसर परवानगी मागितली आहे, मात्र त्यांनी ती दिली नाही तरी आंदोलन करणारच असे मोहन जोशी व अन्य उपस्थितांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसनेही असेच आंदोलन जाहीर केले आहे, महाविकास आघाडी असताना एकत्र का नाही असे विचारले असता बागवे, जोशी यांनी पक्षाच्या वतीने हे आंदोलन असल्याचे सांगितले.
प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी तसेच कमल व्यवहारे, पूजा आनंद, दत्ता बहिरट, रमेश अय्यर, विरेंद्र किराड यावेळी उपस्थित होते.