पुणे : आगामी वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीची बोलणी सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्याच्या लोकसभेच्या जागेचा हट्ट सोडल्याच्रे समजत आहे. सुरुवातीपासून काँग्रेसकडे असणारी ही जागा अखेर त्यांनाच मिळाल्याने काँग्रेसच्या गोटात आनंद असला तरी उमेदवार कोण असणार याबाबत मात्र कोणताही निर्णय झालेला नाही. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुण्यातील कार्यक्रमात राष्ट्रवादीला पुण्याची लोकसभा लढवण्यात रस असल्याचा बॉम्बगोळा टाकला आणि पुण्यातील आघाडीत एकप्रकारे भूकंप झाला. त्यावेळी काँग्रेसने मात्र कुठल्याही परिस्थितीत पुण्याची जागा सोडणार नसल्याचे सांगितले होते. दुसरीकडे राष्ट्रवादीतील काही अतिउत्साहींनी पुण्यातून कोण उभे राहणार याची यादीही काढली होती. याच गोंधळात अचानक स्वतः शरद पवार पुण्यातून उभे राहणार असल्याची आवई उठली.अखेर खुद्द पवारांनी पुण्यातून उभे राहणार असे स्पष्ट केल्यावर या चर्चेला पूर्णविराम मिळाला. मात्र सुरु असलेल्या आघाडीच्या जागा वाटप चर्चेत पुण्याची जागा राखण्यात काँग्रेसला यश आल्याचे समजते. अर्थात जागा राखली तरी जागा जिंकणे तितकेसे सोपे नसून भाजप विरोधात तुल्यबळ प्रतिस्पर्धी उमेदवार उभे करण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे. सध्या तरी काँग्रेसमधून अनंत गाडगीळ यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली असून आगामी काळात इतर नावेही पुढे येण्याची शक्यता आहे.
ठरलं ! आघाडीतर्फे काँग्रेस लढवणार पुण्यातून लोकसभा, राष्ट्रवादीने सोडला हट्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 5:33 PM