लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: भारतीय जनता पार्टीकडून वारंवार काँग्रेसवर होणाऱ्या टीकेला काँग्रेसकडून स्वातंत्र्य वारशाची गाथा सांगत प्रत्युत्तर दिले जाणार आहे. या राज्यव्यापी मोहिमेची सुरुवात १ ऑगस्टला टिळकवाड्यात होत आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या वेळी उपस्थित असतील. प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड व विनायक देशमुख या मोहिमेचे राज्य समन्वयक आहेत. १ ते १५ ऑगस्ट व त्यानंतर पुढे वर्षभर ही मोहीम राज्यात राबवण्यात येणार आहे. ‘व्यर्थ न हो बलिदान’ असे मोहिमेचे नामकरण करण्यात आले आहे.
पटोले यांनी ‘लोकमत’ला सांगितले,“काँग्रेस, नेहरू-गांधी परिवार यावर जी प्रछन्न टीका केली जात आहे त्याला जनता उत्तर देईलच. आमचा उद्देश नव्या पिढीसमोर काँग्रेसचा स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग, स्वातंत्र्योत्तर काळात देश उभारणीत असलेले काँग्रेसचे, काँग्रेस नेत्यांचे योगदान याचा इतिहास मांडायचा आहे.”
मोहिमेचा प्रारंभ करताना पुण्यातील काँग्रेसच्या जुन्या घराण्यांच्या वारसांना बोलावण्यात येणार आहे. राज्यातील १५ हजारपेक्षा जास्त स्वातंत्र्यसैनिकांची नावे, पत्ते तालुकानिहाय वेगळे करण्यात आले आहेत. पक्षाचे तालुकाध्यक्ष तिथे जाऊन त्यांचा गौरव करतील. स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात काँग्रेसचे फैजपूर अधिवेशन, आष्टी चिमूरचा लढा, नंदुरबारच्या शिरीषकुमारचे बलिदान, गवालिया टँक अशा वैशिष्ट्यपूर्ण घटना व ठिकाणे आहेत. राज्यात अशा ६ ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. स्वातंत्र्य चळवळीशी संबधित छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित होणार आहे. स्वातंत्र्य दिनापर्यंत चळवळीचा इतिहास व त्यानंतर पुढे वर्षभर स्वातंत्र्यानंतरची देश उभारणी अशा दोन स्तरांत मोहिमेची रचना आहे.
चौकट
“नव्या पिढीसमोर काँग्रेसचा इतिहास येणे गरजेचे आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आम्ही ही संधी घेत आहोत. स्वातंत्र्य चळवळीत कसलाही सहभाग नव्हता. त्यांनाही यानिमित्ताने याची माहिती मिळेल.”
-नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.