पुणे : काँग्रेस सरकारने त्याठिकाणी जनतेला आश्वासन देऊन ते सत्तेमध्ये आले, पण मागील दोन वर्षांत कोणत्याही आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही. काँग्रेसने ज्या दहा आश्वासनांचा जाहीरनामा दिला ते खोटे निघाल्याने जनतेला धोका निर्माण झाला आहे. सरकारी कर्मचारी यांना पगार मिळत नाही, पेन्शन दिली जात नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याने प्रशासनामध्ये नाराजी आहे. सत्ता काँग्रेसने मिळवली पण सत्ता चालवणे त्यांना अवघड झाले आहे, असे मत हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते जयराम ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री डॉ. अश्वत्थ नारायण, कर्नाटकचे माजी मंत्री नारायण गौडा, भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि तेलंगणा राज्यातील खासदार डी. के. अरुणा, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, कुणाल टिळक, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले उपस्थित होते.
जयराम ठाकूर म्हणाले, हिमाचल प्रदेशला देवभूमी म्हणतात, काँग्रेस नेत्यांनी प्रत्येक महिलेस दर महिना १५०० रुपये देण्याची घोषणा केली, पाच लाख युवकांना रोजगार दिला जाईल, एक लाख सरकारी पदे भरली जातील, प्रत्येक महिन्याला ३०० युनिट वीज मोफत दिली जाईल, पण कोणत्याच आश्वासनांची अंमलबजावणी करण्यात न आल्याने जनतेत आक्रोश निर्माण झाला आहे. ही परिस्थिती महाराष्ट्रात येऊ नये, अशी आमची इच्छा आहे. जनतेने काँग्रेसचा खरा चेहरा ओळखावा, असेही ठाकूर यांनी सांगितले.