पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघात १९७८ च्या निवडणुकांपासून २०२४ पर्यंत काँग्रेस पाचवेळा आणि भाजप तीनवेळा जिंकली आहे. या सर्व लढती चुरशीच्या झाल्या आहेत. २०१९ च्या निवडणुकीत येथे भाजपचे मताधिक्य कमी झाले होते. त्यामुळे आगामी निवडणुकीत येथे काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघात २००९ च्या निवडणुकीत भाजपच्या माधुरी मिसाळ यांना ६४ हजार ९५९, तर राष्ट्रवादीचे सचिन तावरे यांना ४६ हजार ७४ मते मिळाली होती. मनसेचे शिवाजी गदादे यांना २९ हजार ६८९ मते मिळाली होती. या निवडणुकीत मिसाळ यांचा १८ हजार २१६ मतांनी विजयी झाला होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या माधुरी मिसाळ यांना ९५ हजार ५८३, शिवसेनेच्या सचिन तावरे यांना २६ हजार ४९३, तर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सुभाष जगताप यांना २६ हजार १२४, काॅंग्रेसचे अभय छाजेड यांना २१ हजार ९०७ आणि मनसेचे जयराज लांडगे यांना १२ हजार ५६३ मते मिळाली होती. या निवडणुकीत मिसाळ यांचा ६९ हजार ९० मतांनी विजय झाला होता.
२०१९ विधानसभा निवडणुकीत भाजपच्या माधुरी मिसाळ यांना ९७ हजार १२ मते, तर राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांना ६० हजार २४५ मते मिळाली होती. मिसाळ ३६ हजार ७६७ मतांनी विजयी झाल्या होत्या. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ यांना ६९ हजारांचे मताधिक्य मिळाले होते; पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या मताधिक्यात घट होऊन ते ३६ हजार ७२८ झाले. नुकताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पर्वती विधानसभा मतदारसंघात भाजपला २९ हजार ४७७ मताधिक्य होते.