kasba Vidhan Sabha: १९९० पासून भाजपचा बालेकिल्ला काँग्रेसने जिंकला; आगामी निवडणुकीत कोण मैदान मारणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 12:48 PM2024-10-24T12:48:49+5:302024-10-24T12:50:57+5:30
आगामी निवडणुकीत काँग्रेस गेल्या विजयाची पुनरावृत्ती करणार की भाजप पुन्हा आपला गड राखणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार
पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, २०१९ च्या पोटनिवडणुकीने याला छेद दिला. या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला होता. आगामी निवडणुकीत काँग्रेस गेल्या विजयाची पुनरावृत्ती करणार की भाजप पुन्हा आपला गड राखणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या मतदारसंघात आतापर्यंत दोन महिलांना आमदार म्हणून संधी मिळाली आहे.
कसबा पेठ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जायचा. यापूर्वी २८ वर्षांपासून या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व राहिले आहे. १९९५ पासून २०१९ पर्यंत गिरीश बापट पाचवेळा आणि २०१९ मध्ये मुक्ता टिळक निवडून आल्या होत्या. मात्र, २०२३ मध्ये मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली. त्या निवडणुकीत भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसकडून माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत धंगेकर यांनी विजय मिळविला होता. धंगेकर यांना ७३ हजार ३०९ मते, तर रासने यांना ६२ हजार २४५ मते मिळाली होती. धंगेकर यांनी रासने यांच्यावर १० हजार ९१५ मताधिक्य मिळविले होते.
कसबा मतदारसंघाची निर्मिती १९७२ मध्ये झाली होती. त्यात काँग्रेसच्या लीलाबा व्यापारी यांनी काँग्रेसकडून विजय मिळविला होता. त्यानंतर १९७८ मध्ये अरविंद लेले हे जेएनपीच्या तिकिटावर आमदार झाले होते. मात्र, त्यानंतर १९८० मध्ये अरविंद लेले यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून मतदारसंघावर झेंडा रोवला होता. १९८५ मध्ये हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे गेला. या निवडणुकीत उल्हास काळोखे यांनी विजय मिळविला होता. त्यानंतर १९९० मध्ये कसबा पुन्हा भाजपकडे आला. त्यात भाजपच्याच अण्णा जोशी यांनी विजय मिळविला होता. त्यानंतर १९९५ पासून भाजपचे गिरीश बापट हे सलग पाचवेळा भाजपकडून निवडून आले होते. २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या मुक्ता शैलेश टिळक यांना ७५,४९२ मते मिळाली होती. त्याचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे अरविंद शिंदे यांना ४७,२९६ मते मिळाली होती.