पुणे : संसदेत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस व महाराष्ट्रावर टीका केली. त्याच्या विरोधातील आंदोलन ऐनवेळी रद्द करण्याच्या शहर काँग्रेसच्या निर्णयावर कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. त्यांच्यातील काहींनी पक्ष महत्वाचा की प्रभागांवरील हरकती असा प्रश्न करत प्रदेशाध्यक्षांच्या आदेशालाही डावलण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर शाखेने यातील महाराष्ट्रावर टीका झाल्याचा संताप व्यक्त करत बुधवारी सकाळीच निदर्शने करत बाजी मारली. काँग्रेसच्या शहर शाखेनेही बुधवारी सायंकाळी निदर्शने जाहीर केली. त्याचे ठिकाण लष्कर भागातील कोहिनूर चौक निश्चित करण्यावरूनच कार्यकर्त रोष व्यक्त करत होते. ते आंदोलनही प्रभाग रचनेवर हरकती दाखल करण्याबाबत बैठका सुरू असल्याने रद्द करत असल्याचे बुधवारी दुपारी ऐनवेळी जाहीर करण्यात आले. त्याचीच चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती.
पक्ष महत्वाचा की प्रभाग महत्वाचा असा प्रश्न त्यांच्याकडून केला जात होता. प्रदेशाध्क्ष नाना पटोले यांनी पक्षाच्या सर्व जिल्हा व शहर शाखांना मोदींविरोधात आंदोलन करण्याचा आदेश दिला होता. तो डावलून पक्षाच स्थानिक नेते प्रभाग रचनेवर चर्चा करत बसले याचा रोष खासगीत बोलताना कार्यकर्ते व्यक्त करत होते.
दरम्यान याबाबत जोशी यांना विचारले असता त्यांनी ही निदर्शने गुरूवारी दुपारी करण्यात भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यालयासमोर करण्यात येणार असल्याचे सांगितले. महापालिका निवडणूक तोंडावर आहे. शहरातील प्रभागांची रचना, इच्छुक उमेदवारांना त्यात येणाऱ्या अडचणी यावर बैठका सुरू होत्या. हरकती, सुचना दाखल करण्यासंबधी चर्चा सुरू होती. निवडणूकीच्या दृष्टिने हेही महत्वाचे असल्याचे निदर्शने गुरूवारी करावीत असा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.