पुणे : व्हायरल व्हिडिओ प्रकरणानंतर भाजप नेते किरीट सोमय्या आज पुणे दौऱ्यावर आहेत. सोमय्यांचा पुणे दौऱ्यात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार राडा घातला. भाजपचे पर्वतीचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे सध्या आजारी आहेत. प्रयाग हॉस्पिटलमध्ये त्यांची भेट घेतल्यानंतर सोमय्या पर्वती भागातील भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या घरी जेवणासाठी गेले. यादरम्यान सोमय्या यांचा ताफा गजानन महाराज मंदिर चौकातून जात असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने केली.
याच दरम्यान रस्त्याच्याकडेला दबा धरून बसलेले काही कार्यकर्ते अचानकपणे समोर आले. त्यांनी काळे झेंडे दाखवत सोमय्या यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यांनी धावपळ करत काही कार्यकर्त्यांना पकडलं. त्यानंतर सोमय्या कार्यकर्त्यांच्या घरी पोहचू शकले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोमय्या ज्या ठिकाणी आले आहेत त्या इमारती समोरील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणानंतर पुण्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत सोमय्या यांचा निषेध नोंदवला होता. त्यानंतर सोमय्या पुण्यात येताच काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा एकदा आक्रमक झाले.