पुणे : तळागाळात काम करणारा कार्यकर्ता ही काँग्रेसची खरी शक्ती आहे. त्यांच्याकडे थोडे दुर्लक्ष झाले होते, त्याचा तोटा काँग्रेसला झाला, मात्र आता ते पक्षश्रेष्ठींच्या लक्षात आले असून थेट अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडूनच तळातील कार्यकर्त्यांना शक्ती देण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेले १५ दिवस पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला. त्यात अनेकांबरोबर संवाद झाला आहे व पक्ष पुन्हा चैतन्याने संघटीत होईल असा विश्वास काँग्रेस कमिटी नियुक्त पश्चिम महाराष्ट्राच्या निरीक्षक सोनल पटेल यांनी लोकमत बरोबर बोलताना व्यक्त केला.काँग्रेस महासमितीने पटेल यांची पश्चिम महाराष्ट्राकरता निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. गेले पंधरा दिवस त्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, ‘‘काँग्रेस खरी मोठी झाली ती कार्यकर्त्यांमुळेच. नेत्यांनी दिलेली दिशा कार्यकर्तेच तळापर्यंत पोहचवतात. स्वातंत्र्यलढ्यापासून व नंतरही दीर्घकाळपर्यंत ही प्रक्रिया पक्षात सुरू होती. मात्र गेल्या काही वर्षात काही कारणांनी त्यात खंड पडला. कार्यकर्ता दुर्लक्षित झाला. आता मात्र असे होणार नाही. पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांच्या लक्षात ही त्रुटी आली आहे. त्यामुळेच त्यांनी देशाच्या सर्व राज्यातील सर्व विभागांमध्ये थेट महासमितीकडून काहीजणांना नियुक्त केले आहे. त्यातून माझी नियुक्ती झाली आहे.’’दौºयात आलेल्या अनुभवांबाबत बोलताना पटेल म्हणाल्या, ‘‘सोलापूर ,सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणच्या ब्लॉक अध्यक्षांपासून ते जिल्हाध्यक्षांपर्यंत सर्वांबरोबर बोलणी झाली. त्यानंतर या सर्व ठिकाणच्या साध्या कार्यकर्त्यांचीही भेट झाली. या भागात पक्षाचे संघटन चांगले आहे. युवकही पक्षाकडे आकर्षित झाले आहेत. त्यांच्यासाठी आता पक्षाच्या वतीने दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात देशासमोरच्या समस्या, त्यावर कसे बोलायचे, कधी बोलायचे, नागरिकांशी कसा संपर्क साधायचा याबाबत माहिती दिली जाईल. त्यात्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती, पक्षाचे प्रवक्ते त्यांना मार्गदर्शन करतील.’’काही भागात पक्षाचे संघटन कमी झाले आहे. त्या ठिकाणी बदल केले जातील असे स्पष्ट करून पटेल म्हणाल्या, ‘‘प्रदेश शाखेबरोबर त्यासंदर्भात बोलणी केली जातील. आमचा अहवाल थेट काँग्रेस महासमितीला जाणार असला तरी प्रदेश पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्यासही सांगण्यात आले आहे. राहूल गांधी पक्षात पुर्वीचे वैभव नक्की आणतील असे त्यांनी संघटनेबाबत उचलेल्या पावलांवरून स्पष्ट दिसते आहे. जे असेल ते स्पष्ट बोला, त्याशिवाय बदल होणार नाही असे त्यांचे सांगणे आहे व त्यातूनच पक्ष पुन्हा सत्तास्थानी विराजमान होईल. ’’
कार्यकर्तेच दाखवतील काँग्रेसला पुन्हा ‘अच्छे दिन ’ : सोनल पटेल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2018 9:16 PM
तळागाळात काम करणारा कार्यकर्ता ही काँग्रेसची खरी शक्ती आहे. त्यांच्याकडे थोडे दुर्लक्ष झाले होते, त्याचा तोटा काँग्रेसला झाला...
ठळक मुद्देपश्चिम महाराष्ट्रात चांगले संघटनपक्षाच्या वतीने दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार