काँग्रेसने ढकलल्या दुचाकी तर राष्ट्रवादीची घोषणाबाजी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 07:08 PM2018-05-23T19:08:55+5:302018-05-23T19:08:55+5:30
पेट्रोल दरवाढीचा भडका उडाल्याने सत्ताधारी भाजप सरकारच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे शहरात आंदोलने करून निषेध व्यक्त केला.
पुणे : पेट्रोल दरवाढीचा भडका उडाल्याने सत्ताधारी भाजप सरकारच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे शहरात आंदोलने करून निषेध व्यक्त केला. कर्नाटक निवडणूक पार पडल्यापासून जवळपास दररोज पेट्रोलच्या आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. बुधवारी तर शहरातील पेट्रोलच्या दराने ८४रुपयांचा आकडा ओलांडला. अर्थात याबाबत नागरिक नाराजी व्यक्त करत असून हे दर परवडत नसल्याच्या प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहेत. याच दरवाढीचा निषेध काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी आंदोलने करून केला.
काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी यांनी नाना पेठ ते अल्पना टॉकीजपर्यंत दुचाकी ढकल मोर्चा काढला. यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी हे इतिहासातील सर्वाधिक महाग इंधनाचे दर असल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर यामुळे सामान्यांचे कंबरडे मोडणार असल्याचे त्यांनी नमूद केले. या दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंवर परिणाम होणार असून सामान्य जनतेला जगणे कठीण होत असल्याचे त्यांनी म्हटले. दुसरीकडे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि पार्वती मतदार संघानेही याच विषयावर आंदोलन केले. त्यांनी या पेट्रोलवाढीचा निषेध केला. या दरवाढीमुळे सामान्य जनतेच्या हाल अपेष्टांमध्ये वाढ होत असून सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत युवक काँग्रेसचे अध्यक्ष राकेश कामठे यांनी व्यक्त केले.