नाराज, असंतुष्टांना सक्रिय करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

By राजू इनामदार | Published: November 15, 2024 08:11 PM2024-11-15T20:11:22+5:302024-11-15T20:16:54+5:30

कधी समजावून सांगून, तर कधी कारवाईची भीती दाखवून नाराज कार्यकर्त्यांना प्रचारात सहभागी करून घेतले जात आहे

Congress's attempt to activate the disaffected, disaffected | नाराज, असंतुष्टांना सक्रिय करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

नाराज, असंतुष्टांना सक्रिय करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

पुणे : दिवसभराच्या प्रचारानंतर रात्री पक्षातील नाराज आणि असंतुष्ट कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना प्रचारात सक्रिय करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे. पक्षाच्या केंद्रीय समितीने पुण्यात निरीक्षक म्हणून पाठवलेल्या गुजरात व कर्नाटकमधील निरीक्षकांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. कधी समजावून सांगून, तर कधी कारवाईची भीती दाखवून नाराज कार्यकर्त्यांना प्रचारात सहभागी करून घेतले जात आहे.

गुजरातमधील माजी खासदार जगदीश ठाकूर यांना पक्षाने पुणे शहराचे निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. मागील १० दिवसांपासून ते पुण्यात मुक्काम ठोकून आहेत. पक्षाचा उमेदवार असलेल्या शहरातील तीनही मतदारसंघांत गुजरात व कर्नाटकमधील आजी-माजी आमदारांना मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गुजरातमधील आमदार ललितभाई सुसोरिया, राजू ठाकूर, विमलभाई चुडासामा हे आमदार या कामासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक अजित दरेकर यांच्या नेतृत्वाखाली दररोज या टीमची बैठक होत असून, ते मतदारसंघांची सविस्तर माहिती जमा करत आहेत.

या संपूर्ण टीमच्या कामाचे संयोजन आणि नियंत्रण करण्याची जबाबदारी केंद्रीय समितीने कर्नाटक सरकारमधील उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांच्यावर सोपवली आहे. पाटील यांनी मागील आठवड्यात पक्षाच्या तीनही उमेदवारांशी संपर्क साधून त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माजी खासदार ठाकूर यांच्यासोबत बैठक घेऊन कामाचे नियोजन केले. नियोजनानुसार, आता ठाकूर उमेदवारांसोबत मतदारसंघातील विविध भागांतील नाराज आणि असंतुष्ट कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत आणि त्यांना त्यांच्या भागांमध्ये सक्रिय करण्याचे काम सुरू आहे.

"आम्हीही प्रयत्न केले"

भाजपमधील बंडखोरी शमवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आले, बंडखोरांच्या घरी गेले. मात्र काँग्रेसमध्ये असे काही झाले नाही, काँग्रेसच्या बंडखोरांपर्यंत कोणतेही नेते पोहोचले नाहीत, असे विचारले असता, ठाकूर म्हणाले, "केंद्रीय प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यापासून स्थानिक जुन्या नेत्यांपर्यंत अनेकांनी बंडखोरांना फोन केले, भेट घेतली, विनंती केली, आणि कारवाईबाबतही इशारा दिला. परंतु त्यांनी ऐकले नाही. बंडखोरी करायचीच, असा त्यांचा निर्णय झाल्याचे स्पष्ट आहे. ''ही बंडखोरी भाजपमुळे आहे, असे बोलले जात आहे. मात्र, तो त्यांचा प्रश्न आहे," असेही ठाकूर यांनी नमूद केले.

Web Title: Congress's attempt to activate the disaffected, disaffected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.