पुणे : बालगंधर्व रंगमंदिर वाचवण्यासाठी काँग्रेसने सभागृहाजवळ 'बालगंधर्व बचाव आंदोलन' सुरू केले आहे. बालगंधर्व रंगमंदिर हे पुण्याचे सौंदर्य आहे. ते पाडून पुण्याचे सौंदर्यावर घाला घालू नये. "पुण्याची संस्कृती टिकलीच पाहिजे, बालगंधर्व आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे" अशा घोषणाही काँग्रेसने यावेळी दिल्या.
बालगंधर्व रंगमंदिर सभागृह पाडण्याचा प्रस्ताव महापालिकेने गेल्या काही वर्षांपूर्वी मांडला आहे. तो प्रस्ताव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. महापालिका जोपर्यंत हा प्रस्ताव मागे घेत नाही तोपर्यंत हा लढा सुरू ठेवणार असल्याचे काँग्रेसने यावेळी सांगितले. पुण्याची संस्कृती खराब करण्याचा एककलमी प्लॅन भाजपने केला आहे. याला काँग्रेसचा विरोध असेल, असंही काँग्रेसचे नेते यावेळी म्हणाले. या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, नंदकिशोर कपोते तसेच काँग्रेसचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.