काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही

By राजू इनामदार | Published: November 12, 2024 09:19 PM2024-11-12T21:19:57+5:302024-11-12T21:20:31+5:30

'विदेशी गुलामगिरीची मानसिकता असलेल्या काँग्रेसने महाराष्ट्राचा सातत्याने अपमान केला'

Congress's language of Pakistan, PM Modi's attack from Pune; Not a single word on Sharad Pawar | काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही

काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही

राजू इनामदार

पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान संपूर्ण देशात का लागू नव्हते ते काँग्रेसने सांगावे. आता आम्ही ३७० कलम काढल्यानंतर ते परत लागू करा असा प्रस्ताव काँग्रेसने केला. मागील ७० वर्षे पाकिस्तानची जी भाषा होती तीच आता काँग्रेसची झाली आहे असा हल्ला चढवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील प्रचारसभेत काँग्रेसला लक्ष्य केले. यापूर्वीच्या पुण्यातील लोकसभा प्रचारसभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भटकती आत्मा असे म्हणणाऱ्या मोदी यांनी या सभेत मात्र पवार यांच्यावर एक शब्दही काढला नाही.

विधानसभा निवडणुकीतील पुणे व सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या ३१ उमेदवारांच्या प्रचारार्थ स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर मंगळवारी सायंकाळी पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा झाली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, उदयनराजे भोसले, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व महायुतीचे ३१ उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करून, ‘पुण्यातील लाडक्या बहिणींनो व भावांनो, माझा नमस्कार’ अशी मराठीतून भाषणाला सुरूवात करत मोदी यांनी त्यानंतर मात्र काँग्रेसवर तिखट शब्दांमध्ये हल्ला चढवला.

मोदी म्हणाले, काँग्रेसने कर्नाटकमध्ये निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. तिथे दररोज घोटाळे समोर येत आहेत. जनतेकडून लुटलेला पैसा काँग्रेस महाराष्ट्रातील निवडणुकीत वापरत आहेत. डॉ. आंबेडकर यांचे संविधान संपूर्ण देशात का लागू केले नाही याचे उत्तर काँग्रेसने द्यावे. आम्ही देशातील १४० कोटी जनतेच्या पाठिंब्याने ३७० कलम जमिनीत गाडले. काँग्रेसने ते परत लागू करण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर केला आहे. ते आता पाकिस्तानची भाषा बोलत आहेत.
विदेशी गुलामगिरीची मानसिकता असलेल्या काँग्रेसने महाराष्ट्राचा सातत्याने अपमान केला अशी टीका मोदी यांनी केली. हिंमत असेल तर त्यांनी युवराजांच्या तोंडून वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे यांची प्रशंसा करून दाखवावी असे आव्हानही त्यांनी दिले. सत्तेकरता काँग्रेसने कायम तुष्टीकरणाचा खेळ खेळला. आताही ते दलित, आदिवासी मागासवगर्यीय यांची एकजूट तोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्यापासून सावध रहायला हवे. ते तुम्हाला कमकुवत करतील व नंतर आरक्षण काढून घेतील. एक रहेंगे तो सेफ रहेंगे अशी घोषणाही मोदी यांनी दिली.

महायुती आहे तरच राज्याची गती व प्रगती आहे. राज्यात अनेक ठिकाणी फिरलो, सगळीकडे जनतेचा पाठिंबा मिळत आहे. पुण्यात येतानाही लोक रस्त्यावर उभे राहून अभिवादन करत होते. आगामी काळात महायुती सरकार राज्यात वेगाने विकासकामे करेल. पुण्यालाही त्याचा चांगला फायदा होईल. देशातील नागरिकांच्या आकांक्षा हाच आमच्या कामाचा आधार आहे. महायुतीच्या आधीच्या सरकारकडे सांगण्यासारखे काहीच नाही, त्यामुळे ते त्यावर बोलू शकत नाही असे मोदी म्हणाले.

जम्मू कश्मिरसाठीचे आम्ही रद्द केलेले कलम पुन्हा रागू करण्याचा प्रस्ताव करणाऱ्या काँग्रेसला दिवा दाखवण्याची गरज आहे असे म्हणत मोदी यांना श्रोत्यांना मोबाईलची लाईट लावण्याचे आवाहन केले. श्रोत्यांनी त्याप्रमाणे मोबाईलची बॅटरी सुरू करताच संपूर्ण मैदान उजळून निघाले. मोदी यांनी ३६ मिनिटे भाषण केले. संपूर्ण भाषणात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शऱ्द पवार) पक्षाचे अध्यक्ष शऱद पवार यांच्यावर एका शब्दाचीही टीका केली नाही. त्याची चर्चा लगेचच सभास्थळी सुरू झाली.

Web Title: Congress's language of Pakistan, PM Modi's attack from Pune; Not a single word on Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.