पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या जागेसाठी काँग्रेसकडून उमेदवार निवडीचा घोळ कायम आहे. प्रतिस्पर्धी भाजपाकडून याउलट उमेदवाराची घोषणा होऊन प्रचाराला सुरुवात देखील झाली आहे. काँग्रेसकडून उमेदवारीची माळ नेमक्या कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत कार्यकर्ते , स्थानिक नेते यांच्यात संभ्रमावस्था आहे. मात्र, शुक्रवारी सकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित आघाडीच्या संयुक्त बैठकीत पुण्याचा जागेची घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात होती. पण या बैठकीतही निर्णय न झाल्यामुळे पुण्याच्या जागेबाबत ‘वेट अँड वॉच’ सस्पेन्स कायम राहिला आहे.
पुण्यात माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी आघाडीची संयुक्त बैठक पार पडली.यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस नेते उल्हास पवार उपस्थित होते. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आजच्या बैठकीत पुण्याच्या जागेबाबत कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही. मात्र,लवकरात लवकर दिल्लीतूनच पुण्याच्या काँग्रेस उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात येईल. पाटील यांनी माहिती दिली की, लोककला कलावंत सुरेखा पुणेकर यांचे नाव काँग्रेस उमेदवारीसाठी कुठेही चर्चेत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पुण्याच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराबाबत राहुल गांधी निर्णय घेतील असे सांगण्यासही ते विसरले नाही.पुण्यावर लवकरच निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.अजित पवार म्हणाले की, कॉंग्रेसचा पुण्यातील उमेदवार जाहीर होण्यास वेळ लागत असला तरी जेव्हा जाहीर होईल तेव्हा त्याच जोरात काम सुरू करु.