काँग्रेसची पुण्यातील धुसफूस मुंंबईतही, लोकसभा इच्छुकांच्या मुलाखती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 02:16 AM2018-11-16T02:16:02+5:302018-11-16T02:16:57+5:30
लोकसभा इच्छुकांच्या मुलाखती : चार नावे एकमताने नसल्याची तक्रार
पुणे : लोकसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसच्या शहर शाखेत सुरू असलेली धुसफूस प्रदेश काँग्रेसने मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीतही कायम राहिली. पुणे शाखेने बैठक घेऊन ठरवलेली चार नावे अंतिम नाहीत, अशी तक्रार काहीजणांनी केली. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण
यांनी यावर आता वाद घालू नका, असे सांगून ठरलेल्या नावांच्या मुलाखती घेतल्या.
शहर शाखेने लोकसभा उमेदवार ठरवण्यासाठी आयोजित केलेली बैठकच अधिकृत नव्हती, असाही आक्षेप काहीजणांनी घेतला. शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी काही दिवसांपूर्वी एक बैठक घेऊन त्यातील चर्चेनंतर माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, आमदार अनंत गाडगीळ, महापालिकेतील विद्यमान गटनेते अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी व प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड अशी पाच नावे थेट प्रदेश समितीकडे पाठवून दिली. प्रदेश समितीने राज्यातील लोकसभा मतदारसंघांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती बुधवारी मुंबईत आयोजित केल्या होत्या. त्यात याच पाच जणांच्या मुलाखती झाल्या. अन्यही बरेचजण पुण्यातून बैठकीसाठी उपस्थित होते. आमदार विश्वजित कदम, माजी आमदार दीप्ती चवधरी, नगरसेवक अजित दरेकर तसेच रशीद शेख, माजी नगरसेवक सुधीर जानजोत व अन्य काही प्रमुख पदाधिकारी यांचा त्यात समावेश होता.
काँग्रेसकडून मतदारसंघात निरीक्षक पाठवले जातात. त्यांच्या उपस्थितीत बैठक होते. त्यात इच्छुकांबरोबर चर्चा केली जाते. त्यानंतर सर्वसंमतीने नावे निश्चित होतात. असे काहीही झाले नाही व तरीही पाच नावे निश्चित करून ती मुंबईत पाठवण्यात आलेली आहेत, अशी हरकत बैठकीच्या सुरूवातीला काहीजणांनी घेतली. हा वाद वाढत चालल्यामुळे अखेरीस चव्हाण यांनी हस्तक्षेप करत आता वाद घालू नका, असे बजावले व जी पाच नावे आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करू, असे सांगितले. राज्याचे प्रभारी असलेले मल्लिकार्जुन खर्गे बैठकीला उपस्थित राहणार होते, मात्र ते आलेच नाहीत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मात्र यावेळी उपस्थित होते. अशोक चव्हाण तसेच माणिकराव ठाकरे व अन्य काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या मुलाखती घेतल्या. त्यांच्याकडून आता या चौघांपैकी कोणत्याही दोघांची नावे केंद्रीय समितीला पाठवण्यात येतील. तिथे चर्चा झाल्यानंतरच अंतिम शिक्कामोर्तब होईल, मात्र तरीही उमेदवार यातीलच एक असेल नाही, ऐनवेळी वरून दुसरे कोणतेही नाव पुढे येऊ शकते. काँग्रेसची ती पद्धतच आहे, असे एका वरिष्ठ पदाधिकाºयांना सांगितले.
जागा काँग्रेसकडेच
राष्ट्रवादी काँग्रेस पुण्याची जागा मागत आहे, यावर मात्र सर्वच काँग्रेसजनांनी एकमताने टीका केली. पुणे शहरात कधीही त्यांचे वर्चस्व नव्हते. काँग्रेसला चांगले वातावरण आहे, मात्र ते त्रास देत असतात. आघाडीमध्ये जागा आपल्याकडेच राहिली पाहिजे. त्यांनी पुण्यात त्रास दिला तर त्यांना बारामतीत त्रास देऊ, असेही काहीजणांनी सांगितले. मात्र, जागा आपल्याकडे राहील, असे स्पष्ट करून चव्हाण यांनी सर्वांना शांत केले.
विश्वजित यांना उमेदवारी द्यावी
युवक काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी बैठकीतच विश्वजित कदम यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. त्यावर कदम यांनी सन २००९ मध्ये काँग्रेसला पडली त्यापेक्षा जास्त मते सन २०१४ च्या निवडणुकीत आपल्याला पडली होती, असे स्पष्ट केले. कार्यकर्त्यांनी काम केले, मात्र नेत्यांनीच बाहेरचा उमेदवार असा प्रचार केला, असेही ते म्हणाले.