पुणे : शहरात रविवारी सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह सायंकाळनंतर पाऊस सुरू झाल्याने पुणेकरांची तारांबळ उडाली. मात्र हवेत गारवा झाल्याने काहीसा दिलासाही मिळाली. सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत कात्रज परिसरात ३.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रविवारी सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर आकाशात ढगांचा कडकडाट सुरू झाला. तसेच जोराचा वाराही सुटल्याने जोरदार पाऊस पडण्याची चिन्हे दिसू लागली होती. अधूनमधून विजांचा कडकडाटही सुरू होता. सायंकाळी पाच वाजल्यानंतर शहरात ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. तर काही भागात केवळ शिडकावा झाला. सहा वाजल्यानंतर पावसाने जवळपास संपुर्ण शहरालाच व्यापले. ढगांच्या गडगडाटासह जोराचा पाऊस सुरू झाला. सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहरात ०.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. पुणे वेधशाळेने शहरात सोमवारीही गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर मंगळवारी दुपारनंतर गडगडाटी ढग तयार होण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवस आकाश अंशत: ढगाळ राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा फेरा
By admin | Published: March 30, 2015 5:37 AM