विवेक भुसेपुणे : पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस आॅगस्टमध्ये होतो़ पावसाळ्यातील कोरड्या दिवसांची वाढ होत असतानाच हलका व मध्यम पाऊस पडण्याच्या दिवसांमध्ये घट होत असून जोरदार आणि अतिजोरदार पाऊस पडण्याच्या दिवसांमध्ये वाढ होत आहे़ पावसाने सरासरी गाठली तरी, शेतीला ते नुकसानकारक व भूजलपातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग होत नसल्याचे अभ्यासात दिसून आले आहे़डॉ़ पी़ गुहाठाकुर्ता आणि एलिझाबेथ साजी यांनी महाराष्ट्रातील शंभर वर्षांतील पावसाचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे़पावसाची प्रामुख्याने कोरडे दिवस, हलका पाऊस, मध्यम, जोरदार आणि अति जोरदार पाऊस अशी वर्गवारी केली जाते़ त्यात हलका आणि मध्यम पाऊस म्हणजे ६० मिमीपर्यंतचा पडलेला पाऊस गृहीत धरला जातो़ या पावसाचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून आले़ ६० ते १२० मिमी पाऊस पडला तर त्याला जोरदार पाऊस म्हटले जाते़ यामध्ये फारसा बदल झालेला दिसत नाही़ १२० मिमीपेक्षा अधिक पडलेल्या पावसाला अतिजोरदार पाऊस म्हटले जाते़ कोकण किनारपट्टी भागात अशा अतिजोरदार पावसाचे प्रमाण जास्त आहे.मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अशा अति जोरदार पावसाच्या प्रमाणातही वाढ झाली आहे़ आता आपत्ती व्यवस्थापनाचा प्रश्न उभा राहिला आहे़ धरण व आपत्ती व्यवस्थापन यांनी या निष्कर्षाचा उपयोग करुन नियोजन केल्यास हानी टाळण्यास मदत होऊ शकते, असेही डॉ़ गुहाठाकुर्ता यांनी सांगितले़गेल्या शंभर वर्षांत...पाऊसमान वाढलेले जिल्हे : अहमदनगर, अकोला, अमरावती, मुंबई शहर, मुंबई उपनगर, बुलढाणा, धुळे, गडचिरोली, जळगाव, कोल्हापूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, वाशिम, यवतमाळ.पाऊसमान कमी झालेले जिल्हे : औरंगाबाद, बीड, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, जालना, लातूर, नागपूर, उस्मानाबाद, परभणी, रायगड, वर्धा़
अतिजोरदार पावसाच्या दिवसांत होतेय वाढ, १०० वर्षांच्या अभ्यासातून निष्कर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 5:40 AM