बेल्हा : जैवविविधतेचे जतन करणे काळाची गरज आहे. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी आपल्या गावाच्या लोकसंख्येप्रमाणे दरवर्षी गायरान जमिनी, शिक्षण संस्था, घर शेताच्या बांधावर वृक्षलागवड करावी. त्यामध्ये फळझाडांचे प्रमाण अधिक ठेवल्यास आर्थिक लाभही मिळेल. या उपक्रमाची सुरुवात निमगाव सावा (ता. जुन्नर) येथे येत्या पावसाळ्यात पाच हजार वृक्षांची लागवड करून केली जाईल. त्यामध्ये नारळ, आंबा, चिंच, आवळा, चिकू आदी फळझाडांचा व औषधी वनस्पतींचा समावेश अधिक असेल, असे पुणे जिल्हा परिषद लोक जैवविविधता समितीचे सदस्य पांडुरंग पवार यांनी सांगितले.
निमगाव सावा येथे जुन्नर तालुका पंचायत समिती, वन उपविभाग जुन्नर, ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्था मंचर, आय.टी.सी. मिशन सुनेहरा कल यांच्या वतीने आयोजित केलेल्या लोक जैवविविधता नोंदवही कार्यशाळेचे उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते. या वेळी सरपंच माधुरी कारभळ, उपसरपंच किशोर घोडे, ग्रामसेवक डी. एस. खैरे, ज्ञानशक्ती विकास वाहिनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गार्गी विशाल काळे-वळसे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. निमगाव सावा, शिरोली बुद्रुक, सुलतानपूर, औरंगपूर, बोरी बुद्रुक, बोरी खुर्द, जाधववाडी, साकोरी, पारगाव तांबेवाडी, मंगरूळ, राजुरी या गावांतील व्यवस्थापन समिती सदस्य, पदाधिकारी व ग्रामसेवक उपस्थित होते.
“जैव विविधता नोंद्वहीचे महत्व याबाबत चित्रफितीद्वारे पुणे वन उपकार्यालयाचे बायो प्रोजेक्ट तज्ञ दौलत वाघमोडे यांनी मार्गदर्शन केले.” जुन्नर वन उपविभागाचे सहाय्यक वन संरक्षक अधिकारी अमर भिसे, आयटीसी मिशन सुनेहरा कलचे प्रकल्प अधिकारी भरत राऊत यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
चौकट
आंबेगाव-जुन्नर तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वत रांगेत चार हजार ५०० औषधी वनस्पती आहेत. दुर्मिळ औषधी वनस्पतींचे जतन झाले पाहिजे. शतावरी, आवळा, शेवगा, हिरडा,बेहरडा, गुळवेल, हाडसांधी आदींचा उपयोग औषध निर्मितीसाठी होतो.वृक्ष,पक्षी,जलचर व वन्यजीवी प्राणी ही निसर्गाची सायकल जपल्यास कृत्रिम श्वासोच्छवास घेण्याची गरज भासणार नाही. जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण करणे हे काम गाव पातळीवर प्रभावीपणे होणे गरजेचे आहे. जुनी बारव व वृक्ष संवर्धनासाठीही निधीची तरतुद आहे. ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेने लोक जैव विविधता नोंद्वाहीचे व जनजागृतीचे काम कौतुकास्पद आहे.
कल्पना टेमगिरे -नाईकवाडी, विभागीय वनअधिकारी (नागपूर)
फोटो : निमगावसावा (ता.जुन्नर) हवालोक जैव विविधता कार्यशाळेत बोलताना पुणे जिल्हा परिषद लोक जैव विविधता समितीचे सदस्य पांडुरंग पवार