नीरा : शिक्षकांच्या अंतरजिल्हा बदली प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र, पती पत्नी एकत्रीकरण करण्याच्या संवर्ग दोन मध्ये ग्रामविकास विभागाने शासकीय किंवा निमशासकीय सेवेत असणारा जोडीदारच विचारात घेतल्याने परजिल्ह्यात कामावर असणाऱ्या हजारो शिक्षकांना बदलीपासून वंचित राहावे लागणार आहे.
आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत संवर्ग दोन मध्ये पती पत्नी एकत्रीकरण अंतर्गत पती किंवा पत्नीच्या जवळच्या तीस किलोमीटर अंतरावर जोडीदाराला नियुक्ती मिळते. सरकारच्या या धोरणामुळे खरे तर अनेक गुरुजींचे संसार वाचले मात्र हे पुण्य केवळ शासकीय किंवा निमशासकीय सेवेत असलेल्या गुरुजनांनाच मिळाले. खासगी कंपनी, पतसंस्था, धमार्दाय संस्थांतील संचालक, कार्यवाहक, ग्रंथपाल यांसाहित अनेक इतर ठिकाणी काम करत असलेल्या जोडीदाराला अपात्र ठरविण्यात आल्याने हजारो गुरुजी या बदली प्रक्रियेपासून वंचित राहिले. तलाठी, कोतवाल, ग्रामसेवक या पदांसाठी उच्च पदवीधर ते पीएचडी धारक अर्ज करत आहेत. त्यातही गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरती प्रक्रिया बंद आहे तर टीइटी च्या फार्समध्ये अनेक भावी गुरुजी अडकून बसले. पैकी अनेकांनी आज ना उद्या काळ बदलेल अशी भूमिका ठेवत डीएड पदविकाधारक जोडीदाराशी लग्न केले. मात्र, नंतरच्या काळात नोकरीची आशा धूसर झाल्यावर अनेकांनी मिळेल तेथे नोकरी स्वीकारली. पैकी अनेकांनी खासगी लेखापाल, कंपनी, पतसंस्था यात नोकरी स्वीकारली तर काहींनी धमार्दाय संस्थेच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत स्वीकारत शिक्षणासाठी काम सुरू केले. २७ फेब्रुवारी २०१७ रोजी निश्चित केलेल्या धोरणात संवर्ग दोन मध्ये जिल्हा परिषद कर्मचारी, नगरपालिका, निमशासकीय, केंद्र सरकारी कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्था कर्मचारी तसेच शासन मान्यताप्राप्त संस्थेतील कर्मचारी म्हणून दोघांपैकी एकजण सेवेत असल्यास त्यांना बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणून संबोधण्यात आले आहे.
एकीकडे कुणी नोकरी देता का नोकरी? अशी परिस्थिती असताना दोघांपैकी एकजण खासगी कंपनी किंवा कार्यालयात काम करणाया शिक्षकांवर एकप्रकारे अन्याय झाल्याचे मत व्यक्त होत आहे. सध्या राज्यात अनेक शिक्षक स्वगृहापासून शेकडो किमी अंतरावर आपले कर्तव्य बजावत आहेत.
सरळ मार्गाने बदली फॉर्म भरताना प्रचंड संख्येमुळे अर्थातच बदलीचा नंबर लागण्याची शक्यता मुळातच कमी असते. त्यातच जिल्हाअंतर्गत बदलीसाठी शेजारील जिल्ह्याच्या नजीकच्या तालुक्यात बदली होण्यासाठी १० वर्षे सेवेची अट घालण्यात आली आहे.
त्यामुळे वर्षानुवर्षे असे अनेक गुरुजी व बाई त्यांचा जोडीदार कामावर असतानाही बदली प्रक्रियेला मुकत आहेत त्यामुळे शासनाने याचा विचार करून धोरणात सुधारणा करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.