पुणे : तुम्हाला रिवॉर्ड पॉर्इंटचे तुमचे पैसे अकाऊंटला डिपॉझिट करून देतो किंवा अकाऊंटची माहिती अपडेटस करून देतो असे सांगून तुमच्या अकाऊंटसह डेबिट किंवा क्रेडिट कार्डची माहिती कुणी मागितली तर, थांबा, विचार करा! कदाचित तुम्ही फसवलेही जाऊ शकता. तुमच्याकडून ही माहिती दिली गेल्यास तुमच्या खात्यातून संबंधित व्यक्तीकडून कुठूनही ट्रन्झॅक्शन केली जाऊ शकते आणि तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते.गेल्या दोन वर्षांमध्ये अशा प्रकारच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्हयांमध्ये वाढ झाली आहे. सायबर क्राईम सेलकडे गेल्या नऊ महिन्यात १२३ अर्ज प्राप्त झाले असून, अर्जदारांचे तब्बल ६० लाख रूपयांचे रिफंड मिळविण्यात सेलला यश आले आहे. देशात नोटाबंदी लागू झाल्यानंतर डेबिट आणि क्रेडिट कार्डने व्यवहार करण्याचे प्रमाण वाढले आहे. कार्डचा जास्तीत जास्त वापर करणार्या खातेदाराला बँकेकडून रिवॉर्ड पॉर्इंट्सही दिले जातात. याचाच फायदा घेऊन खातेदारांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डची माहिती घेऊन त्यांच्या खात्यातून पैसे काढण्याच्या टोळ्या कार्यरत झाल्या आहेत. आपल्या खात्यातून पैसे डेबिट झाल्याचा बँकेचा मेसेज आल्यानंतरच संबंधित व्यक्तीला आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येते. सायबर क्राईम सेलकडे तत्काळ अर्ज केला तर व्यवहार त्वरित थांबवता येऊन पैसे परत मिळण्यास मदत होते. फसवणूक करणारी व्यक्ती ही बहुतांश वेळेला महाराष्ट्राबाहेरीलच असते. पैसे खर्च झाल्यावर त्याच्याकडून पैसे जप्त करणे अवघड होते. यासाठी अर्जदाराने दोन ते तीन तासांच्या आतच सायबर सेलशी संपर्क साधावा असे आवाहन आर्थिक व सायबर गुन्हे चे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी केले आहे.
सायबर क्राईम सेलकडे तक्रार आल्यावर ज्या मर्चंटला पैसे गेले असतील त्यांना ईमेल करून व्यवहार हा फसवणुकीचा असल्याने ते पैसे आहे तसे रोखण्यास सूचना दिल्या जातात. कोणताही व्यवहार पूर्ण होण्यासाठी अर्जदाराकडून मर्चंटकडे व मर्चंटकडून विक्रेत्याकडे पैसे जाण्यासाठी काही कालावधी लागतो. यादरम्यान अर्जदार यांनी सायबर सेलकडे संपर्क साधल्यास व्यवहार त्वरित थांबवता येऊ शकतील.- सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे
२०१६ आणि २०१७ मध्ये सायबर क्राईम सेलकडून रिफंड करण्यात आलेली रक्कम आणि आकडेवारी रिफंड अर्ज संख्या रिफंड झालेली रक्कम२०१६ ६६ २३, ५७, ०९२२०१७ (जानेवारी ते सप्टेंबर) १२३ ६०, २४, ९६२