पुणे : भाजपच्या एका खासदाराच्या हट्टापायी पुणे मेट्रो अडीच वर्षे रखडली. परिणामी प्रकल्पाचा खर्च हजार कोटींनी वाढला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी केला. येत्या शनिवारी मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या पार्श्वभूमीवर मेट्रो भाजपाने आणली असा दावा त्यांच्या नेत्यांकडून केला जात असताना पवार यांनी मेट्रो रखडवल्यावरून भाजपावर शरसंधान साधले.पुण्याचा मेट्रो प्रकल्प केंद्राकडे मान्यतेच्या अंतिम टप्प्यात असताना मेट्रो एलिव्हेटेड असावी की भुयारी यावरून मोठा वाद निर्माण झाला. या वादात मेट्रो बरेच दिवस रखडली. यावरून अजित पवार यांनी भाजपाला जबाबदार धरले आहे. कर्वेनगरमध्ये तयार करण्यात आलेल्या सिंथेटिक टेनिस कोर्टचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते शंकर केमसे, नगरसेवक दिलीप बराटे, नगरसेविका लक्ष्मी दुधाने उपस्थित होते. स्वारगेट ते पिंपरी या मेट्रो मार्गाचा निगडीपर्यंत विस्तार व्हावा यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे पाठपुरावा करणार आहेत, असे पवार यांनी सांगितले. एका चहावाल्याकडे कोट्यवधी रूपयांची संपत्ती सापडत असल्याकडे निर्देश करीत चूक झाली आणि राजकारणात आलो, चहा विकला असता तर बरे झाले असते, अशी मिश्किल टिप्पणी पवार यांनी केली. आगामी २०१७ या वर्षात कोणत्याही नागरिकाला रांगेत थांबावे लागू नये अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांनी केले. देवेंद्र सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. उपमहापौर मुकारी अलगुडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
खासदारांमुळे मेट्रो खर्चिक
By admin | Published: December 23, 2016 12:55 AM