राजगुरूनगर (पुणे) : कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मी राज्याचा आमदार आणि मंत्री होतो. तुमच्यासारखे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आम्ही जन्माला आलो नाही. आम्हाला काय मिळाले यावर बोलताना आपल्या वयाचा, कर्तृत्वाचा विचार करा, असा सणसणीत टोला राज्याचे कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ यांनी आमदार तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना लगावला.
नाशिकवरून पुण्याच्या दिशेने जात असताना सोमवारी दुपारी राजगुरूनगर येथे थांबून छगन भुजबळ यांनी हुतात्मा राजगुरू, भगतसिंग, सुखदेव, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यावेळी भुजबळ बोलत होते.
मंत्री छगन भुजबळांच्या पदांची संख्या, यादी प्रसिद्ध करीत आमदार रोहित पवार यांनी शरद पवार यांनी आणखी काय द्यायला हवे, असे ट्वीट केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले, रोहित पवार आईच्या पोटात चार महिन्यांचे असताना मी मुंबईत आमदार होतो, मंत्री होतो. ते सहा महिन्यांचे असतील तेव्हा विरोधी पक्षनेता होतो. १५ वर्षांचे असतील तेव्हा राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठ पदावर होतो. यांना राजकारणाची जाण किती? हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले. मागे बड्यांचे आशीर्वाद आहेत. माझे तसे नाही. असे सुनावले. जुन्नरचे आमदार अतुल बेणके काही म्हणत असले तरी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पुढच्या निवडणुकीत असतील असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.
दरम्यान, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे आमच्या शपथविधीला पहिल्या रांगेत बसले. का परतले? माहीत नाही. त्यांना शिरूरच्या पाच आमदारांनी निवडून पाठवले. पुढे काय होईल हे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील हेच सांगू शकतील, असेही ते म्हणाले.
यावेळी खेड बाजार समितीचे माजी सभापती विनायक घुमटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलासराव सांडभोर, गणेश घुमटकर, दीपक घुमटकर, कैलास केदारी, अशोक कडलग, अमित घुमटकर, धीरज घुमटकर आदी मान्यवर व नागरिक यावेळी उपस्थित होते.