इन्ट्रो
तृप्ती धोडमिसे-नवत्रे यांनी योग्य नियोजन, संयम आणि सातत्याने घेतलेल्या कठोर मेहनतीच्या जोरावर खासगी क्षेत्रात नोकरी आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळत सुरुवातीला राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) आणि नंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत देशात १६ वा, तर राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. नंदुरबार जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी पदाचा कार्यकाल त्यांनी नुकताच पूर्ण केला. सध्या त्यांचे पुण्यातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे प्रशिक्षण सुरू आहे.
तृप्ती धोडमिसे यांनी शालेय शिक्षण हडपसरच्या साधना विद्यालयात तर बी. टेक.चे (प्रॉडक्शन इंजिनिअरिंग) पदवी शिक्षण पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी खासगी कंपनीत प्रॉडक्शन इंजिनिअर म्हणून कामाला सुरुवात केली. नोकरी करत असताना त्यांचे पती सुधाकर नवत्रे यांनी त्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यास प्रोत्साहित केले.
यूपीएससीचा आवाका मोठा असल्याने सन २०१०-११ साली त्यांनी एमपीएससीची तयारीचा निर्णय घेतला. यासाठी त्यांना पतीबरोबर सासू-सासरे यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या या प्रयत्नाला २०१३ साली यश आले. त्यांची राज्य कर विभागात सहायक आयुक्त या पदावर निवड झाली. राज्य शासनाच्या सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांनी यूपीएससीच्या तयारीला सुरुवात केली. मात्र, २०१५ साली पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आले. परंतु, खचून न जाता कामाचे आणि वेळेचे योग्य नियोजन करत दुसऱ्या प्रयत्नात पूर्व, मुख्य परीक्षा पास करत मुलाखतीपर्यंत झेप मारली. मात्र, केवळ ४ गुण कमी पडल्याने त्या पदापासून वंचित राहिल्या. त्यानंतर त्यांनी पुन्हा जोमाने प्रयत्न सुरू केले. मात्र तिसऱ्या प्रयत्नात त्यांना अपयश आले. त्यामुळे यापुढे यूपीएससी करायची नाही, असा त्यांनी निर्णय घेतला. मात्र, त्यावेळी पती सुधाकर नवत्रे तसेच सासर आणि माहेरच्या सर्व सदस्यांनी तुझ्यात क्षमता आहे. फक्त अभ्यासात मूल्यवर्धन (व्हॅल्यू ॲडिशन) करण्याचा त्यांना सल्ला दिला. त्या पद्धतीने चौथ्या प्रयत्नात त्यांनी नियोजन करत परीक्षेसाठी काय अपेक्षित आहे, त्याची सविस्तर उजळणी करत तयारी केली. त्यासाठी पहिल्या तीन प्रयत्नावेळी झालेल्या चुकांची त्यांनी पुनरावृत्ती टाळली. तसेच परीक्षाभिमुख अभ्यास सुरू केला. त्याचा त्यांना चांगला फायदा झाला.
चालू घडामोडींची तयारी :
स्पर्धा परीक्षा म्हटले की प्रचंड स्पर्धा ही ओघानेच आली. स्पर्धेत तुम्हाला टिकायचे तर एक-एक गुण महत्त्वाचा मानला जातो. त्यासाठी सतत अद्ययावत राहावे लागते. त्यासाठी नियमितपणे एक मराठी आणि एक इंग्रजी वर्तमानपत्र वाचणे आवश्यक आहे. शॉर्ट नोट्स काढून ठेवल्यास परीक्षेचा काळात त्या उपयोगी पडतात.
सी सॅटची तयारी :
पूर्व परीक्षा वैकल्पिक पद्धतीची असल्याने यामध्ये जनरल मेंटल ॲबिलिटी, कम्युनिकेशन स्कील्स, लॉजिकल रिजनिंग, चालू घडामोडी अशा विविध बाबींचा समावेश असल्याने नियमित सराव आवश्यक आहे.
मायक्रो नोटस काढल्या :
मुख्य परीक्षेला निबंध, सामान्य अध्ययनचे (जनरल स्टडीज) एकूण ४ पेपर तसेच वैकल्पिक विषयाचे दोन पेपरची तयारी करताना मायक्रो नोट्स अत्यंत उपयोगी पडतात. त्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन त्या-त्या विषयांचे गरजेची पुस्तक वाचणे, तसेच त्यातील नोट्स काढल्यास त्याचा उपयोग होतो.
सराव परीक्षा (मॉक टेस्ट) :
संपूर्ण अभ्यास झाल्यानंतर स्वत:ला चेक करण्यासाठी परीक्षेच्या एक महिना आधी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा सराव परीक्षा (मॉक टेस्ट) द्यावी. त्यामुळे आपल्याला वेळेचे नियोजन समजते. पेपरमधील कोणता घटक सोडवण्यासाठी नक्की किती वेळ लागतो, याचा अंदाज येताे. त्यामुळे अंतिम परीक्षेपूर्वी त्यात सुधारणा करता येते. पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या आधी नियमितपणे सराव केल्यास त्याचा खूप फायदा होतो. तसेच या परीक्षेत लेखनशैलीचा कस लागतो. त्यामुळे वेळेचे नियोजन करून लेखनाचा सातत्याने सराव गरजेचा आहे.
सोशल मीडियापासून दूर रहा
यूपीएससीची तयारी करताना वेळेचे नियाेजन फार गरजेचे असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दिवसभराचे नियोजन करताना सोशल मीडियापासून दूर राहावे. कारण त्यामध्ये बराच वेळ कसा निघून जातो हे कळत नाही. तसेच केलेला अभ्यास लक्षात राहत नाही. त्यामुळे या माध्यमांचा शक्यताे वापर टाळावा.