पुणे : मुंढवा येथील पबमध्ये गोळीबार केल्या प्रकरणात मोक्काअंतर्गत कारवाई केलेल्या आरोपी अमोल चव्हाण याला उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. याप्रकरणी १६ जूनपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंढवा येथील हॉटेल वाय किकी टिकी लौन्ज या पबमध्ये जून २०१८ मध्ये गुंड टोळीप्रमुख सचिन पोटे याने नीलेश चव्हाण यांच्यावर वाद झाल्याने गोळीबार केला होता. याप्रकरणी पोलिसांनी सचिन पोटे, अमोल चव्हाणसह १० जणांवर प्रथम गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली. यावर सचिन पोटे याने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यापाठोपाठ आता अमोल चव्हाण यानेही उच्च न्यायालयात दाद मागितली. त्यावर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ही घटना २०१८ मधील असून त्यावेळेस फक्त तोडफोडीची तक्रार दाखल होती व आता फिर्यादी याने २०२१ मध्ये गोळीबाराची तक्रार दिल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला. न्यायालयाने याबाबत पोलिसांना त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले असून, तोपर्यंत आरोपीला अटक न करण्याचे व कठोर कारवाई न करण्याचे आदेश दिले. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुढील तारीख १६ जूनची दिली आहे. आरोपीच्या वतीने अॅड. प्रताप परदेशी, अॅड. अभिषेक अवचट, अॅड. सिद्धांत मालेगावकर, अॅड. मजहर मुजावर, अॅड. प्रमोद धुळे यांनी काम पाहिले.