बारामतीकरांना दिलासा! कटफळ येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील ५२ जणांचा अहवाल निगेटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 03:35 PM2020-05-07T15:35:15+5:302020-05-07T15:35:37+5:30
''त्या'' कोरोनाग्रस्त रुग्णावर मुंबई येथे शहरात उपचार सुरु आहेत.त्याची प्रकृृती स्थिर
बारामती : कटफळ (ता. बारामती) येथे सापडलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या ‘हाय रिस्क’ कॉन्टॅक्ट ५२ जणांचे आज अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी 'लोकमत' ला ही माहिती दिली. या बातमीमुळे धास्तावलेल्या बारामतीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. या रुग्णाचे कुटुंबीय,रुग्णांची भेट घेतलेले नातेवाईकांसह रुग्णांने उपचार घेतलेल्या रुग्णालयातील डॉक्टर,स्टाफ अशा ५२ जणांचा यामध्ये समावेश आहे.या सर्वांच्या घशातील स्वॅब कोरोना तपासणीसाठी बुधवारी(दि ७)बारामतीत घेण्यात आला होता.त्यानंतर हा स्वॅब पुणे येथे पाठविण्यात आला होता.त्याचा अहवाल आज मिळाला.या सर्वांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
बारामती रेड झोनमधून ऑरेंज झोनमध्ये जाण्यास थोडा कालावधी बाकी असताना कोरोनाचा आणखी एक रुग्ण सापडला. आता त्याच्या संपर्कातील अन्य ५२ लोकांचे अहवाल चांगले आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.शासकीय सुचनेनुसार बारामतीतील व्यापारी पेठ देखील १२ मे पासुन सुरु होण्याची शक्यता आहे.
बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागात दुसरा कोरोनाचा संसर्ग झालेला ७९ वर्षीय रुग्णाला पित्ताशयाचा कर्करोग आहे. ३ मे रोजी हा रुग्ण उपचारासाठी त्याच्या मुंबई येथील नातीकडे गेला आहे .४ मे रोजी केलेल्या तपासणीमध्ये त्याचा अहवाल ' पॉझिटिव्ह ' आल्याने तो कोरोनाबाधित. असल्याचे स्पष्ट झाले होते. तालुक्यातील कटफळ येथील हा रुग्ण असुन ग्रामीण भागातील दुसरा तर, बारामती परिसरातील हा नववा रुग्ण आहे. त्याच्यावर मुंबई येथे शहरात उपचार सुरु आहेत.त्याची प्रकृृती स्थिर आहे.यासंदर्भात आज सकाळी मुंबई येथील डॉक्टरांबरोबर चर्चा झाल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ खोमणे यांनी सांगितले.
——————————————