पुणे - राज्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून येत असलेल्या पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. शहरात रविवारपासून सलग चौथ्या दिवशी कोरोना पॉझिटीव्ही रुग्णसंख्या कमी झाल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्वत: ट्विट करुन याबाबत समाधान व्यक्त केलंय. सलाम पुणेकर, सलग चौथ्या दिवशी कोरोनामुक्त संख्या अधिक, असे ट्विट महापौर मोहोळ यांनी केलंय.
पुण्यात बुधवारी सगल तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या वाढीच्या प्रमाणापेक्षा कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण अधिक आढळून आले होते. बुधवारी दिवसभरात ५ हजार ५२९ कोरोनाबाधित आढळून आले. ६ हजार ५३० जण कोरोनामुक्त झाले होते. बुधवारी दिवसभरात २४ हजार ४०९ जणांनी कोरोना तपासणी केली आहे. तपासणीच्या तुलनेत आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची टक्केवारी ही २२.६५ टक्के इतकी होती. त्यानंतर, रुग्णसंख्या कमी होण्याचा आणि रुग्ण बरे होण्याचा आकडा चौथ्या दिवशी गुरुवारीही दिलासादायक देणारा ठरला आहे. स्वत: महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिलीय.
सलाम पुणेकर : सलग चौथ्या दिवशी कोरोनामुक्त संख्या अधिक !पुणे मनपा हद्दीत सलग चौथ्या दिवशी नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येची आकडेवारी कोरोनामुक्त रुग्णसंख्येपेक्षा कमी नोंदवली गेली आहे. आज नवे ४,५३९ तर कोरोनामुक्त ४,८५१ नोंदवले गेले, अशा शब्दात रुग्णसंख्या घटल्याने आणि रुग्ण बरे झाल्याचे प्रमाण वाढल्याने त्यांनी आनंद व्यक्त केलाय.
पुणे शहरात आज नव्याने ४ हजार ५३९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ३ लाख ८७ हजार ०३० इतकी झाली आहे.
दिवसभरात ४ हजार ८५१ रुग्णांना डिस्चार्ज !
शहरातील ४ हजार ८५१ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ३ लाख २९ हजार १४८ झाली आहे. उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि टीमचे मनःपूर्वक धन्यवाद !अशी आकडेवाडीही महापौर मोहोळ यांनी शेअर केलीय.