पुणे : शहर व परिसराला पावसाने ओढ दिल्याने आधीच अपुऱ्या पाणीपुरवठ्याने हैराण असलेल्या पुणेकरांवर तूर्तास तरी पाणीकपातीचे संकट येणार नसल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
मान्सून दाखल होऊनही पाऊस पडत नसल्याने, शहरावर पाणीकपातीचे संकंट येणार अशी चर्चा सुरू झाली आहे. तर गतवर्षीच्या तुलनेत खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये केवळ ४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्याने, पावसाने ओढ दिली तर पुढील काळात शहराला एक दिवसआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्याची वेळ प्रशासनावर येऊ शकते अशी शक्यता होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला असता पाणीपुरवठा प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी, १५ जुलैपर्यंत तरी पाणीकपातीची शहरात शक्यता नसल्याचे स्पष्ट केले आहे.
दि. २२ मे रोजी खडकवासला धरणसाखळीत एकूण पाणीसाठा ३४ टक्के म्हणजे ९.११ टीएमसी इतका हाेता. ताे आजमितीला ३.८१ टीएमसी इतका झाला आहे. यामुळे शिल्लक साठा जलसंपदा विभागाने पिण्याच्या पाण्यासाठी राखीव केला असून, शेतीसाठीची आवर्तने बंद केली आहेत. परिणामी १५ जुलैपर्यंत तरी पाणीकपातीची शक्यता शहरात राहणार नाही. परंतु, पुढील काळात पावसाने ओढ दिली तरच पुण्याच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम हाेऊ शकताे.