पुणे : शहरात गेल्या दहा दिवसांपासून दिलासादायक चित्र पाहण्यास मिळत आहे. सातत्याने नव्या कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक होत आहे. मंगळवारी दिवसभरात ६ हजार १५९ कोरोनामुक्त झाले आहे. ३ हजार ८७१ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
मंगळवारी दिवसभरात १६ हजार ६५० जणांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २३.२४ टक्के इतकी आहे़. तर आज दिवसभरात ८२ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २५ जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.६२ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या ६ हजार १५९ कोरोनाबाधित रुग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार ३६८ रुग्ण हे गंभीर आहेत. शहरात आत्तापर्यंत २० लाख ६६ हजार ८१३ जणांची कोरोना तपासणी केली आहे. यापैकी ४ लाख ६ हजार ५२६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ३ लाख ५४ हजार ८४० कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील सक्रिय रुग्णसंख्या ही सद्य:स्थितीला ४५ हजार ७५ इतकी झाली आहे.