पुणे : भाजपचे नगरसेवक धीरज घाटे यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी दोघा संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. विकी क्षीरसागर, मनोज पाटोळे आणि महेश आगलावे यांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी धीरज रामचंद्र घाटे (वय ४६, रा. स्नेहनगर, वृंदावन) यांनी फिर्याद दिली आहे. धीरज घाटे हे भाजपचे नगरसेवक असून आंबिलओढा परिसरातून ते निवडून आले आहेत. त्यांच्याबरोबर विकी क्षीरसागर मनोज पाटोळे हे पूर्वी काम करीत होते. ५ वर्षांपासून त्यांनी बरोबर काम करणे सोडले. विकी क्षीरसागर याचा भाऊ राकेश क्षीरसागर मनसेचा कार्यकर्ता असून तो आगामी निवडणुकीसाठी इच्छुक आहे. विकी क्षीरसागर हा घाटे बरोबर काम करणारे कार्यकर्त यांना त्यांच्याबरोबर काम करावे या कारणासाठी वेगवेगळे प्रलोभने दाखवित असे.
घाटे हे ३ सप्टेंबर रोजी दुपारी चहा पिण्यासाठी येथील शेफ्रॉन हॉटेलमध्ये गेले होते. हॉटेलमधील एसी रुममध्ये तिघे जण येऊन बसले. ते त्यांच्याकडे पहात होते. तेव्हा त्यांना संशय आला. त्यावेळी त्यांच्याबरोबर असलेले अमर आवळे हे हॉटेलबाहेर गेले. तेव्हा तेथे विकी क्षीरसागर व मनोज पाटोळे थांबले असल्याचे पाहून त्यांनी घाटे यांना सांगितले. जवळपास अर्धा तास तिघे जण त्यांच्या हालचालीवर नजर ठेवून होते. त्यानंतर ६ सप्टेंबरला ते पुन्हा त्या हॉटेलमध्ये गेले असताना त्या ठिकाणी असणारे संशयित हॉटेल बाहेर थांबलेला विकी क्षीरसागर व मनोज पाटोळे यांच्याशी निगडीत होते. त्यानंतर घाटे हे हॉटेलच्या बाजूला असलेल्या ज्ञानल मंगल कार्यालयात गेले. तेथे संशयित व्यक्तीबाबत चौकशी केल्यावर त्यांना कार्यालयातील स्टाफने हटकले होते. त्यावेळी त्यांनी हल्लाची माहिती घेण्यास आले असे सांगितले. त्यानंतर घाटे यांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही पाहिले. तेव्हा त्यांना खात्री झाली की तेव्हा ते हल्ल्याच्या तयारीने आले होते.
दरम्यान, आगामी कालावधीत होणाऱ्या महापालिकेच्या नगरसेवकपदाच्या निवडणुकीत त्याचा भाऊ राकेश क्षीरसागर हा सहज निवडून यावा म्हणून चार ते पाच साथीदारांना एकत्र करून घाटे यांच्या खूनाचा कट रचून शेफ्रॉन हॉटेलमध्ये त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आला होता. हा प्रकार समोर आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पाच ते सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, काही संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.