पुणे : प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांना महाळुंगे एमआयडीसी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. बेकायदा जमाव जमवून जेसीबी - पोकलॅन्ड मशीनच्या सहाय्याने कंपनीच्या रस्त्यावर खड्डे पाडून आणि गॅस पाईपलाइन तोडून लोकांच्या जीवितास धोका निर्माण त्यांच्यासह अनोळखी दहा ते पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मी प्रसिद्ध कीर्तनकार असल्याने मला बदनाम करण्याचा हा संबंधित बिल्डरचा कट असल्याचा आरोप चैतन्य महाराज वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
चैतन्य महाराज वाडेकर यांच्यासह यांचे दोन भाऊ अॅड. अमोल आणि प्रमोद वाडेकर व नातेवाईक यांना म्हाळुंगे पोलिसांनी अटक केल्याच्या वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर चैतन्य वाडेकर यांनी त्यांची बाजू पुण्यातील पत्रकार भवन येथे त्यांची बाजू मांडली. त्यावेळी त्यांनी पीएमआरडीए च्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बिल्डरला पाठिंबा असून संबंधीत बिल्डरकडून त्यांच्या जागेत अतिक्रमण केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एका कंपनीचा रस्ता उकरल्यामुळे अटक झाल्याच्या अर्धवट माहितीच्या आधारे बातम्या प्रसारित झाल्या आहेत. मात्र, यातून संबंधित बिल्डरकडून माझे नाव खराब करण्याचा हेतूने असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
वाडकर म्हणाले, आमच्याकडे जागेच्या मालकीचे पुरावे असून देखील आम्हाला आमच्या जागेत जाण्यासाठी या व्यवसायिकांनी मज्जाव केला होत. माझे भाऊ प्रमोद वाडेकर यांनी आमची असलेली मोकळी जागा, ज्या जागेचा वापर अनाधिकृतपणे सदर बांधकाम व्यवसायिक जाण्या-येण्यासाठी वापर करत आहेत. त्या जागेचा कोणालाही वापर करून न देण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे त्या ठिकाणी माझा भाऊ आमच्या जागेचे नियोजन करत होता, तिथे कोणतेही गुंड उपस्थित नव्हते आणि मी माझ्या घरातच बसून होतो. सदर प्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच पोलिस त्या ठिकाणी आले आणि मला फोन केला की, आम्ही तुमच्या घरापाशी आलेलो आहे. आम्हाला पण तुमच्यासोबत फोटो घेऊद्या, तुम्ही भेटायला या. मी तिथे गेलो आणि त्यांनी माझे त्याठिकाणी फोटो काढले. दुसऱ्या दिवशी सदर बांधकाम व्यवसायिकांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे तक्रार केल्यानंतर त्यांनी सदर ठिकाणी जाऊन माझा मोठा भाऊ प्रमोद यांना घेऊन गेले. आणि त्या ठिकाणचा ताबा पोलिसांच्या उपस्थितीत आमच्याकडून काढून घेऊन सदर बांधकाम व्यवसायिकांना देत असताना आमचा अपंग भाऊ अॅड. अमोल वाडेकर यांनी त्यांना थांबवल्यानंतर पोलिसांनी त्यांना देखील पोलीस स्टेशनला येण्याची विनंती केली. माझ्या भावासोबत मदतीला मी पोलीस स्टेशनला गेलो असता पोलिसांकडून आमच्या तिघांवर आमचेच वडिलोपार्जित मालकी व ताबेवहिवाटीच्या जागेतून बांधकाम व्यावसायिकाचा रस्ता अडवलेचे कारणावरून गुन्हा दाखल केला. आम्हाला जामिनावर सोडण्यात आले. सदर प्रकरणी जरी गुन्हा दाखल झाला असला तरी मी त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो. हा बांधकाम व्यावसायिक खेड तालुक्यातील तसेच पुणे जिल्ह्यातील एक कुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक असून सर्वानाच त्याच्या चुकीच्या कामांची प्रचिती आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.